अबुधाबी – रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा नवोदित वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याच्या भेदक गोलंदाजीसमोर सनरायझर्स हैदराबादचा डाव 20 षटकांत 7 बाद 141 धावांवर रोखला गेला. या सामन्यातील विजयासह स्पर्धेच्या क्रमवारीत दुसरे स्थान मिळवण्याची बेंगळुरूला चांगली संधी मिळाली आहे.
बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकत हैदराबादला प्रथम फलंदाजी दिली. त्यांचा डाव सुरू झाल्यावर धावफलकावर 14 धावा असताना सलामीवीर अभिषेक शर्मा बाद झाला. त्यानंतर जेसन रॉय व कर्णधार केन विल्यमसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी केली व संघाचा डाव सावरला. ही जोडी संघाला मोठी धावसंख्या उभारून देणार असे वाटत असतानाच विल्यमसन 29 चेंडूत 4 चौकारांसह 31 धावा करून बाद झाला. त्यानंतर प्रियम गर्गही अपयशी ठरला.
दुसरीकडे अर्धशतकाजवळ आलेला रॉयचाही संयम सुटला व अनावश्यक फटका मारून 44 धावांवर बाद झाला. त्याने 38 चेंडूत 5 चौकार फटकावले. त्यानंतर मात्र, जेसन होल्डर व वृद्धिमान साहा यांनी केलेला प्रतिकार वगळता अन्य एकही फलंदाज बेंगळुरूच्या गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही. बेंगळुरूकडून हर्षल पटेलने 3 तर डॅनियल ख्रिस्तियनने 2 गडी बाद केले. जॉर्ज गार्टन व यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक –
सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 7 बाद 141 धावा. (जेसन रॉय 44, केन विल्यमसन 31, जेसन होल्डर 16, प्रियम गर्ग 15, अभिषेक शर्मा 13, वृद्धिमान साहा 10, हर्षल पटेल 3-33, डॅनियल ख्रिस्तियन 2-14, यजुवेंद्र चहल 1-27, जॉर्ज गार्टन 1-29).