स्थानिक नेतृत्वाला मुभा ; महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होणार?
सातारा- सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कोणती रणनीती आखायची याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक नेतृत्वावर सोपविल्याने विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा शब्द बॅंकेच्या राजकारणात अंतिम राहणार, हे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला या निवडणुकीत कायम ठेवायचा का, यावर चर्चा होणार आहे. दरम्यान, बॅंकेच्या 1964 मतदारांची अंतिम यादी विभागीय निबंधक कार्यालयाकडून अंतिम करण्यात आली आहे.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम 18 ऑक्टोबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस व शिवसेना यांना जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळात जागा मिळणार का? आघाडीचे सूत्र ठरले तर किती जागा मिळणार, हा औत्सुक्याचा विषय आहे. नवरात्रात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी होण्याची चिन्हे आहेत. फलटण, कराड, सातारा हे तीन तालुके बॅंकेच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असून पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीशी सख्य असलेले, पण भाजपचे आमदार असलेले विद्यमान अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले व रामराजे नाईक निंबाळकर या त्रयींभोवती राजकीय समीकरणे फिरणार आहेत, हे निश्चित.
बॅंक विरोधकांच्या हाती जाऊ नये यासाठी रामराजेंनी कंबर कसली आहे. विकास सेवा सोसायट्यांच्या 11 जागा बिनविरोध करायचा राष्ट्रवादीचा मानस आहे. राज्यसभेतील भाजपचे खासदार उदयनराजे, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माणचे आ. जयकुमार गोरे या संचालकांना “कात्रजचा घाट’ दाखविण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे आहेत.
गोरे व निंबाळकर यांचे ठराव वैध ठरल्याने काही जागांसाठी निवडणूक लागण्याची चिन्हे आहेत. जिल्हा बॅंकेच्या 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे. सप्टेंबरमध्ये प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होऊन, त्यावर हरकती आल्या होत्या. त्यावरील सुनावणी झाल्यानंतर 27 सप्टेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार होती; परंतु कायदेशीर बाबींमुळे त्यास विलंब झाला. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर विभागीय सहनिबंधक कार्यालयाने अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली आहे.
जिल्हा बॅंकेसाठी 1964 मतदार राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा गटातून 11 जागा निवडून द्यायच्या असून, त्यासाठी तालुकानिहाय मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सातारा तालुक्यात 145, जावळी 49, महाबळेश्वर 11, कराड 140, पाटण 103, कोरेगाव 90, खटाव 103, माण 74, खंडाळा 51, वाई 59, फलटण 131, असे मतदार आहेत. खरेदी-विक्री संघ 11, कृषी प्रक्रिया 27, नागरी सहकारी बॅंका 374, गृहनिर्माण व दूध उत्पादक संस्था 272, औद्योगिक व विणकर संस्था मतदारसंघ 324, असे एकूण 1964 मतदार आहेत.
पाच जागा राखीव असून, त्यामध्ये दोन महिला प्रतिनिधी, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती अथवा विशेष मागासवर्गीय सदस्य प्रवर्गातून प्रत्येकी एक, अशा तीन जागांचा समावेश आहे.