मुंबई – वसईच्या मधुबन परिसरातील एका रस्त्यावर आज सकाळी दोन हजाराच्या नोटांचा खच पडलेला पाहायला मिळाला. या नोटा गोळा करण्यासाठी झुंबड उडाली. नोटांचा खच पाहून लहान मुले आणि नागरिकांनी नोटा गोळा करायला सुरुवात केली. पण नोटा उचलून पाहिल्या तेव्हा त्या खोट्या असल्याचे लक्षात आले आणि सर्वांचा हिरमोड झाला.
वसई पूर्व भागातील मधुबन परिसरात दुपारच्या सुमारास सन्नी नावाच्या वेब सीरीजची शूटिंग होती. चित्रिकरणाच्या वेळी 2 हजार रुपयांच्या खोट्या नोटांचा वापर करण्यात आला होता. शूटिंग संपल्यानंतर रस्त्यावर डुप्लिकेट नोटांचा खच पाहून आजूबाजूच्या नागरिकांसह लहान मुलांनी नोटा पाहण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली होती.
दरम्यान, या घटनेमुळे वसई, नालासोपारा परिसरात वसईच्या मधुबन येथे नोटांचा पाऊस पडल्याची अफवा वेगाने पसरली. यामुळे मधुबन परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मोठी गर्दी या परिसरात जमा झाली होती. अखेर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळावरुन गर्दी कमी केली.