दुबई – गोलंदाजांच्या सरस कामगिरीनंतर शुभमन गिलचे दमदार अर्धशतक व नितीश राणा व दिनेश कार्तिकच्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह कोलकाताने यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशाही कायम राखल्या.
हैदराबादला 115 धावांत गुंडाळून कोलकाताने अर्धी लढाई तर आधीच जिंकली होती. त्यानंतर गिलच्या सहजसुंदर फलंदाजीने त्यांनी विजयही थाटात मिळवला. मात्र, कोलकाताच्या डावाची सुरुवातही खराब झाली होती. गिलसह डावाची सुरुवात करणारा व यंदाच्या स्पर्धेत अत्यंत भरात असलेला व्यंकेश अय्यर साफ अपयशी ठरला. त्यानंतर आलेल्या अनुभवी राहुल त्रिपाठीनेही निराशा केली. हे दोघे बाद झाल्यावर नितीश राणाने गिलला साथ देत डाव सावरला. दरम्यान, गिलने अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपल्या 57 धावांच्या खेळीत 50 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार फटकावले. मात्र, पुन्हा एकदा अत्यंत बेजबाबदार फटका मारून तो बाद झाला. राणानेही चांगला खेळत असताना विनाकारण उंचावरून फटका मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. त्याने 25 धावा केल्या. त्यानंतर दिनेश कार्तिक नाबाद 18 व कर्णधार इयान मॉर्गन नाबाद 2 यांनी संघाचा विजय साकार केला. हैदराबादकडून जेसन होल्डरने 2 गडी बाद केले. रशिद खान व सिद्धार्थ कौल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकत प्रथं फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय त्यांना फटका देणारा ठरला. वरुण, टीम साऊदी, शिवम मावी यांच्या भेदक गोलंदाजीसमोर हैदराबादचा संघ 20 षटकांत 8 बाद 115 धावाच करू शकला.
कोलकात्याचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीने पहिल्याच षटकात हैदराबादचा सलामीवीर फलंदाज वृद्धिमान साहाला पायचीत केले. साहा यंदाच्या स्पर्धेत स्तत्याने सरस फलंदाजी करत असल्याने त्याचे बाद होणे हैदराबादला चांगलेच महागात पडले. या धक्क्यातून त्यांचा संघ अखेरपर्यंत सावरलाच नाही. दुसऱ्या बाजूने शिवम मावीने सलामीवीर जेसन रॉयला 10 धावांवर बाद केले. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पॉवर प्ले संपला तेव्हा हैदराबादच्या 6 षटकात 2 बाद 35 धावा झाल्या होत्या. मात्र, त्याचवेळी शाकिब अल हसनने विल्यमसनला धावबाद केले.
विल्यमसनने 26 धावा केल्या. हैदराबादचे अर्धशतक 10 व्या षटकात फलकावर लागले. त्यानंतर शाकिबच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्मा बाद झाला. त्यानंतर नवोदित फलंदाज प्रियम गर्गने चांगला खेळ केला मात्र, त्याला मोठी दावसंख्या उभारता आली नाही. त्याला वरुण चक्रवर्तीने 21 धावांवर बाद केले. जेसन होल्डरनेही निराशा केली.
अब्दुल समदने थोडाफार प्रतिकार केला. मात्र, तरीही त्याची खेळी संघाला दीडशतकी धावाही गाठून देऊ शकली नाही. संघाचे शतक फलकावर लागण्यापूर्वीच त्यांचे सात फलंदाज बाद झाले होते. 19 व्या षटकात हैदराबाद संघाचे शतक पूर्ण झाले. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती, टीम साऊदी आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 8 बाद 115 धावा. (केन विल्यमसन 26, अब्दुल समद 25, प्रियम गर्ग 21, वरुण चक्रवर्ती 2-26, टीम साऊदी 2-26, शिवम मावी 2-29). कोलकाता नाईट रायडर्स – 19.4 षटकांत 4 बाद 119 धावा. (शुभमन गिल 57, नितीश राणा 25, दिनेश कार्तिक नाबाद 18, इयान मॉर्गन नाबाद 2, जेसन होल्डर 2-32, सिद्धार्थ कौल 1-17, रशिद खान 1-23).