पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच इतर महाविद्यालयांच्या नावे दिले जाणारे पदवीचे बनावट गुणपत्रक, सर्टिफिकेट विकणारी टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला होता. आता यानंतर टोळीचे काही धक्कादायक कारनामे उघड झाले आहेत.
एका गुणपत्रिकेसाठी ही टोळी 45 ते 50 हजार रुपये घेत होती. या बनावट गुणपत्रिकांचा वापर काहींनी उच्च शिक्षण, नोकरी तसेच पदवीधर मतदारसंघात मतदानासाठी केल्याचेही उघड झाले आहे.
याप्रकरणी गणेश संपत जावळे, मनोज धुमाळ (दोघे रा. नीरा, पुणे), वैभव लोणकर (रा. बारामती) या आरोपींना अटक करण्यात आली होती.
संबंधित टोळीबाबत सहायक पोलीस निरीक्षक संदीप येळे यांना माहिती मिळाली होती. त्यांनी नीरा या ठिकाणी एका प्रिंटिंग प्रेसवर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना पुणे विद्यापीठाचे लेटरहेडवरील बनावट मार्कलिस्ट व सर्टिफिकेट सापडले. याप्रकरणी आरोपींविरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तपासामध्ये त्यांच्या सर्व्हरमध्ये 45 वेगवेगळ्या पदव्यांच्या गुणपत्रिका मिळाल्या आहेत. ज्या त्यांनी विक्रीसाठी तयार केल्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “जावळे एजंट म्हणून काम करतो, तर धुमाळ याची वीर येथे प्रिंटिंग प्रेस आहे. जावळे गरजू तरुणांना हेरून त्यांच्या मागणीप्रमाणे प्रमाणपत्रे धुमाळकडून बनवून देत होता. त्यांनी मागील सात वर्षांत अनेक बनावट गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे वाटली आहेत.’
परीक्षेत नापास झालेल्या व्यक्तींना आरोपींनी “पास’ म्हणून दाखवले. त्यांनी पूर्ण बनावट कागदपत्रेदेखील केली. ज्याद्वारे तरुणांनी पदवीधर निवडणुकीत मतदान केले. आता आमच्याकडे डेटा आणि इतर तपशील आहेत. आम्ही पुणे विद्यापीठ आणि इतर महाविद्यालयांना पत्र पाठवणार आहोत. त्यामुळे ही कागदपत्रे भविष्यात पडताळली जातील.
– अशोक शेळके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा