पुणे – आधारकार्डमध्ये मोबाइल क्रमांक किंवा ई-मेल आयडी अपडेट करणे अथवा लिंक करणे, ही प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. ही दोन्ही कामे करण्यासाठी आता आधार केंद्रांमध्ये जाण्याची गरज नाही, आता पोस्टमन यांच्यामार्फत या दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.
पोस्टमन यांच्याकडे असलेल्या मोबाइलऍपद्वारे आधारशी मोबाइल क्रमांक अथवा ई-मेल आयडी लिंक करण्याची कामे घरबसल्या होणार आहेत. पुणे शहरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक आणि यूआयडीएआयने याबाबतचा एक करार केला आहे. त्यानुसार आता पोस्टमन घरी येऊन आधारकार्डमध्ये मोबाइल नंबर अपडेट करून देईल. यासाठी पोस्टमन यांच्याकडे स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. यातील ऍपच्या माध्यमातून आधारकार्ड नंबर अपडेट करून मिळणार आहे. त्यासाठी पोस्टमनना ट्रेनिंगही देण्यात आली आहे.
हे प्रशिक्षित पोस्टमन आता घरोघरी जाऊन आधारकार्ड मोबाइल नंबरशी लिंक करून देणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोस्ट मास्तर बी. पी. एरंडे यांनी दिली. यासह मोठ्या सोसायटीने मागणी केल्यास त्यांच्या सोसायटीमध्ये पोस्टमन येऊन ही कामे करणार आहे.
यासाठी सोसायटी प्रमुखांनी जवळच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन एरंडे यांनी केले आहे. आधार कार्डमधील पत्ता, नावातील बदल करणे यासह आधारकार्डमधील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी आधार केंद्रांमध्ये होत आहे.
शहरातील मोजकी आधार केंद्र यामुळे याकामांसाठी वेळ लागतो. तसेच नागरिकांना रांगेत बऱ्याच वेळा उभे राहावे लागते. या सर्व पार्श्वभूमीवर पोस्ट खात्याने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.