सातारा -महाबळेश्वर येथील अल्पवयीन युवतीवरील अत्याचार प्रकरणात आरोप करणाऱ्या भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून पुरावे द्यावेत आणि त्यानंतर कोणाला सहआरोपी करायचे, याची भाषा करावी.
मुलांनी केलेल्या गुन्ह्यासाठी शिक्षा वडिलांना देणे, कोणत्या कायद्यात बसते? वाघ यांनी आमच्यावरील आरोप सिद्ध करावेत, नाही तर तात्काळ मागे घ्यावेत, असे प्रत्युत्तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले. पीडित मुलगी व कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची मागणीही गोऱ्हे यांनी केली.
महाबळेश्वरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांना सहआरोपी करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केली होती. पोलीस यंत्रणा महाविकास आघाडीच्या दावणीला बांधल्याचा आरोपही केला होता. नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्यात सोमवारी पत्रकार परिषदेत वाघ यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल उपस्थित होते. गोऱ्हे म्हणाल्या, महाबळेश्वरमधील पीडितेच्या कुटुंबीयांची मी भेट घेतली. तिच्याबाबतीत घडलेल्या घटनेचा तपशील जाणून घेतला. तिचे कुटुंब ज्या सोसायटीत राहते, तेथे त्या मुलीला कोणीही त्रास देत नसल्याचे समजले.
त्या मुलीची व कुटुंबीयांची सुरक्षा आणि मनोधैर्य अथवा इतर शासकीय योजनेत पुनर्वसन करण्याची सूचना केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयितांना जेरबंद केले आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी पीडितेला दिवस गेले होते, याची चौकशीही संबधितांनी केली नव्हती, ही गोष्ट अमानवी आहे. डीएनए अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईलच; परंतु चित्रा वाघ यांच्याकडे पुरावे असतील, तर त्यांनी ते न्यायालयात द्यावेत.
हवेत बाण मारू नयेत. कोणत्याही प्रकरणात विरोधी पक्ष बोलू शकतो, पण त्यांनी साधार बोलावे. वाईच्या महिला पोलीस उपअधीक्षक योग्य तपास करत आहेत. कोणी कोणाच्या दावणीला बांधलेले नाही.
दावणीतून सुटलेले त्यांना भेटले असतील, तर दावण मजबूत करू, असा टोला गोऱ्हे यांनी लगावला. या प्रकरणातील दोषींना शिक्षा होईलच; पण वस्तुनिष्ठ चौकशी होईल. डीएनए चाचणीनंतरच आरोपपत्र दाखल होईल. त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी एक तर प्रतिज्ञापत्र दाखल करून, कोर्टात आरोप सिद्ध करावेत, अन्यथा मागे घ्यावेत, असे गोऱ्हे यांनी सुनावले.