जालना – महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला घेतली जाणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामार्फत घेतली जाणारी गट क आणि गट ड पदाची परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र परिक्षेच्या आदल्या दिवशी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा होण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी घरातून बाहेर पडले होते, काही विद्यार्थी पोहोचले होते तर काहीजण प्रवासात होते. आयत्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. अनेकांच्या वेळेचे आणि पैशांचेही नुकसान झाले होते. त्याबाबत दिलगिरी व्यक्त करत आरोग्यमंत्र्यांनी आज नवी तारीख जाहीर केली आहे. आरोग्य विभागाच्या गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना 9 दिवस अगोदर हॉल तिकिट मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
6205 पदांसाठी परीक्षा
दरम्यान, आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्यातील 1500 केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जात आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीद्वारे केली जाणार आहे.