गांधीनगर – गुजरात विधानसभेला पहिल्या महिला सभापती मिळाल्या आहेत. तेथे भाजप आमदार निमाबेन आचार्य या गुजरात विधानसभेच्या सभापतिपदावर आरूढ झाल्या आहेत. त्यांच्या उमेदवारीला कॉंग्रेसनेही समर्थन दिले आहे.
त्यामुळे त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली.आजपासून गुजरात विधानसभेचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. त्याच्या पहिल्या दिवशी ही सभापतिपदाची निवडणूक झाली.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली. विरोधी पक्षनेते परेश धनानी यांनी त्यांच्या प्रस्तावाला अनुमती दिली. 182 जणांच्या विधानसभेत कॉंग्रेसचे 65 आमदार आहेत. गुजरात विधानसभेचे आधीचे सभापती राजेंद्र त्रिवेदी यांनी 16 सप्टेंबर रोजी राजीनामा दिला आहे. त्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. ते महसूल आणि संसदीय व्यवहार खात्याचे मंत्री आहेत.