नागपूर – जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी चक्क भाजप उमेदवाराचा प्रचार काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी केला असल्याचे समोर आले आहे. देशमुख यांच्या भाजप प्रचारामुळे नागपूरातील काँग्रेसमध्ये खळबळ उडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष देशमुख यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा उमेदवार पार्वता काळबांडे यांच्या प्रचारार्थ सावरगाव येथील त्यांच्या निवासस्थानी स्थानिक भाजप नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे फोटो आता व्हायरल झाले आहे.
देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांचा वाद दिल्लीत देखील पोहोचला होता. त्यांची महिन्याभरापूर्वीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांचे काँग्रेसमध्ये मन रमत नसल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.