पिंपरी – करोना महामारीत अनेकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली. घरातील कर्ता पुरुष बेरोजगार झाला. परंतु संकट काळात घरातील महिलांनी हार न मानता घराची आर्थिक बाजू सांभाळण्याची जबाबदारी घेतली.
त्यांनी विविध प्रकारचे घरगुती व्यवसाय सुरू केले. त्यात त्यांना यशही आले व इतर महिलांपुढे आदर्शही निर्माण केला. एक प्रकारे संसाराचा मोडलेला आर्थिक कणा सुधारण्यास मदत करणाऱ्या शहरातील महिलांचा दैनिक प्रभातने घेतलेला आढावा.
शहरातील विविध भागांत असलेल्या स्टॉल, टपऱ्या आणि छोटी-मोठी दुकाने अन् खानावळींमध्ये महिलांचा वावर वाढलेला पहावयास मिळत आहे. ज्या पद्धतीने छोट्या व्यवसायातील महिलांचा वावर वाढला आहे, तसाच वावर काही प्रमाणात का होईना मोठ्या व्यवसायातही दिसून येत आहे.
आर्थिक स्वावलंबनासाठी अनेक महिला आपल्या चारचाकी वाहनातून भाजी विक्रीचा व्यवसायही करताना दिसत आहेत. महिलांनी पुढाकार घेत आर्थिक पाठबळ दिल्याने अनेकांचे संसार स्थिरावले आहेत.
वस्तू आणि सेवा
अनेकांनी आपला व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने सुरू केला. त्यात काहींनी व्हॉट्सऍपचे ग्रुप तयार करून त्याद्वारे आपले प्रोडक्ट इतरांपर्यंत पोहचविले. व्यवसायामध्ये प्रामुख्याने खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
शशिकला कुलकर्णी, सांगवी
“लॉकडाऊनच्या काळात मी डबे बनवून देण्याचा व्यवसाय केला. त्या काळात अनेकजण होमक्वारंटाइन होते. त्यांना 21 दिवस पोळी-भाजी, वरण-भात असा दोन वेळेचा डबा मी देत होते. तसेच दिवाळीतही मागणीनुसार सर्व पदार्थ घरगुती पद्धतीने आणि मागणीनुसार दिले. ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.”
अर्चना आनंदकर, भोसरी
मी या वर्षी प्रथमच लोणची, चटणी हा व्यवसाय केला. माझे फूड टेक्नॉलॉजीचे शिक्षण झाले असल्याने आणि सध्या नोकरीची बाहेर संधी नसल्याने मी घरातूनच हा व्यवसाय सुरू केला. माझ्याकडे 13 प्रकारचे लोणची, चटण्या आहेत. यातून घरातही आर्थिक हातभार लागला.
रजनी सोनवणे, आकुर्डी
“”माझ्या पतीचा व्यवसाय आहे. मलाही काही वेगळे करून दाखवायचे होते. त्यामुळे सुरुवात वडापाव व्यवसायाने केली. वडापावचा ऐके ठिकाणी तीन दिवसांसाठी स्टॉल लावला होता. त्या तीन दिवसांत माझा 22 ते 25 हजारांचा व्यवसाय झाला. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला असून, मी आता जेवणाच्या ऑर्डर घ्यायला सुरवात केली. ऑर्डरप्रमाणे जेवण बनवून देत आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.”