नवी दिल्ली – डॉलर वधारत असल्यामुळे व शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत असल्यामुळे सोन्याच्या दरातील घसरण गेल्या आठवड्यापासून चालूच आहे. आजही सोन्याच्या दरात मोठी घट नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 264 रुपयांनी कमी होऊन 46,140 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मात्र तयार चांदीचा दर मात्र 22 रुपयानी वाढून 63,486 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,798 डॉलर तर तयार चांदीचा दर 24.37 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषण तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारत आहे, त्याचबरोबर अमेरिकेची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढण्याबरोबरच डॉलर बळकट होत आहे. त्यामुळे आगामी काही काळ तरी सोन्याच्या दरावर दबाव राहण्याची शक्यता आहे.