न्यूयॉर्क –अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत आर्यना सबालेंका व बार्बरा क्रेजीकोव्हा यांनी महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बेलारूसच्या सबालेंकाने या सामन्यात बेल्जियमच्या एलिस मार्टिनवर 6-4, 6-1 अशी मात केली. क्रेजीकोव्हाने आपली आगेकूच कायम राखताना गार्बीन मुगुरुझाचा 6-3, 7-6 असा पराभव केला.
अन्य एका लढतीत कॅनडाच्या लियाल ऍनी फर्नांडेजने सनसनाटी निकाल नोंदवताना जर्मनीच्या अंजेलिका कार्बरवर 4-6, 7-6, 6-2 अशी मात केली. अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सने ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीचा 6-2, 1-6, 7-6 (7-5) असा पराभव केला व स्पर्धेतील धक्कादायक निकाल नोंदवला.
पुरुष एकेरीत सर्बियाच्या अग्रमानांकित नोवाक जोकोविचने जपानच्या केई निशिकोरीचा 6-7 (4-7), 6-3, 6-3, 6-2 असा पराभव केला.
जोकोविचचा हा यंदाच्या वर्षांतील सलग 24 वा ग्रॅंडस्लॅम विजय ठरला. इटलीच्या जॅनिक सिनरने फ्रान्सच्या गाएल मॉंफिल्सला 7-6 (7-1), 6-2, 4-6, 4-6, 6-4 असे पराभूत केले.
बोपण्णाकडून अपेक्षा
भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा याने क्रोएशियाचा सहकारी इव्हान डोडिग याच्या साथीत खेळताना पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बोपण्णा व डोडिग जोडीने आर्थर रिंडर व युगो नाइस यांच्यावर 6-3, 4-6, 6-4 अशी मात केली. यंदाच्या मोसमातील विविध स्पर्धांमध्ये सुमार कामगिरी केलेल्या बोपण्णाकडून या स्पर्धेत सरस कामगिरीची अपेक्षा आहे.