पुणे – हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये सोमवारी अचानक काही कुटूंबांनी मोकळ्या जागेवर अतिक्रमण केले. याचा जाब विचारायला गेलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तेथील महिलांनी दमदाटी करुन हाकलून लावले. या अगोदर देखील तेथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. या झोपड्या हटवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली होती. आता पुन्हा एकदा येथे झोपड्या उभ्या रहाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
या झोपड्या झाल्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींचा औद्योगिक परिसरात वावर वाढतो. याचा त्रास येथील उद्योजकांना होत असल्याचे हडपसर इंडस्ट्रीअल असोसिएशनच्यावतीने सांगण्यात आले. ही औद्योगिक वसाहत 1960 पासून वसली आहे. येथे मागील काही वर्षापासून तेथील उद्योजकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील मोकळ्या जागांवर अतिक्रमणाबरोबरच शहरातील राडा रोडाही टाकला जात आहे.
येथील नालेही राडारोड्याने बुजवण्यात आले आहेत. यामळे जोरदार पावसात पाणी औद्योगिक वसाहतीत घुसण्याची भिती नेहमीच असते. हडपसर वाहतूक शाखेच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेवर हे अतिक्रमण झाले आहे. दिवसभरात अनेकांनी येथे कापडाच्या सहाण्याचे मार्किग करुन जागा बळकावली. तेथे झोपड्या बांधल्या जाण्याची शक्यता आहे. यासाठी परिसरातील झाडे तोडण्याबरोबरच जमीनीची खोदाईही केली जात आहे.
जेव्हा येथील उद्योजक अतिक्रमण करणाऱ्यांना जाब विचारायला जातात, तेव्हा त्यांना शिवीगाळ करुन धमकावण्यात येते. झोपड्या उभ्या रहाताच बेकायदा दारु विक्री, जुगार आणी अवैध्य धंद्यांचे पेव फुटते. येथूनच औद्योगिक परिसरातील गुन्हेगारी वाढत जाते. यासंदर्भात संघटनेने अनेकदा प्रशासन व पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याची हवी तशी दखल घेतली जात नाही. आता येथे होऊ लागलेले अतिक्रमण त्वरीत रोखण्याची गरज आहे. अन्यथा औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारी वाढून त्याच्या उद्योगांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
अतिक्रमण हटवण्यासंदर्भातील पत्र हडपसर इंडस्ट्री असोसिएनशच्यावतीने पोलीस, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणी पोलिसांना दिले.