थिरूवनंतपूरम – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपल्या पक्ष कार्यालयातील सोव्हिएत नेते जोसेफ स्टॅलिन यांचा फोटो त्वरित हटवावा, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. युक्रेनमध्ये स्टॅलिन यांच्या राजवटीत हजारो लोकांची कत्तल करण्यात आल्याची बाब अलीकडेच उघड झाली आहे.
तेथे हजारो माणसांचे सांगाडे एकाच परिसरात सापडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने ही मागणी केली आहे. केरळ विधानसभेतील कॉंग्रेसचे नेते व्ही. डी. सतीशन यांनी ही मागणी केली आहे. युक्रेनमध्ये रशियाचे राज्य असताना स्टॅलिन यांनी जो नरसंहार केला त्याचे सत्य आज बाहेर आले आहे.
अशा क्रुरकर्मा नेत्याला मार्क्सवाद्यांनी आपला आदर्श मानणे योग्य नाही, अशी मागणी त्यांनी केली आहे. फेसबुकवर त्यांनी या संबंधात जी पोस्ट लिहिली आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, नरसंहाराचे मोठे दुष्कृत्य जगात कंबोडियात पोल पॉट आणि जर्मनीत हिटलरने केले त्या खालोखाल आता स्टॅलिन यांचा नंबर लावावा लागेल असेही त्यांनी नमूद केले आहे.
युक्रेनमध्ये सापडलेले सांगाडे हे कम्युनिस्टांच्या हुकुमशाही तत्वज्ञानाची साक्ष देत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. स्टॅलिन यांनी त्या काळी सुमारे पंधरा लाख लोकांचा नरसंहार केल्याची बाबही सतीशन यांनी निदर्शनाला आणून दिली आहे. केरळातील कम्युनिस्ट जर लोकशाहीचे मूल्य मानत असतील तर त्यांनी तातडीने स्टॅलिनचा फोटो हलवला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले आहे.