वॉशिंग्टन – अमेरिकेने अफगाणिस्तानातील इसिस म्हणजेच इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांवर ड्रोनने हल्ले केल्याचे वृत्त आहे. काबुलच्या विमानतळाबाहेर परवा झालेल्या बॉम्बस्फोटाच्या कृत्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने ही कारवाई केली. त्यात इसिसच्या प्लॅनरना लक्ष्य करण्यात आले. अफगाणिस्तानातील नानघर प्रांतात हे हल्ले करण्यात आले.
आम्ही आमचे लक्ष्य साध्य केले आहे आणि आमच्या टार्गेटला आम्ही ठार मारले आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅ. बिल अर्बन यांनी ही माहिती दिली. या हल्ल्यात कोणीही सामान्य नागरिक ठार झालेले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काबुलमध्ये बॉम्बस्फोट घडवणारे दहशतवादी जिवंत राहता कामा नयेत, अशी ठाम भूमिका अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी घेतली आहे, अशी माहिती व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने दिली. आम्ही त्यांना शोधून काढू आणि त्यांचा खात्मा करू असे बायडेन यांनी स्व:त आपल्या भाषणात नमूद केले होते.
इस्लामिक स्टेटच्या खोरसन गटाकडून हा हल्ला केला गेला होता. या गटाला इसिस-के असे म्हणतात. अमेरिकेच्या हल्ल्यात त्यांचा म्होरक्या मारला गेला किंवा कसे याची नेमकी माहिती अजून मिळालेली नाही.