पुणे –पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) होर्डिंग उभारणीच्या निविदात टक्केवारी घेतल्याप्रकरणी लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
मात्र, पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर, लांडगे यांनी न्यायालयासमोर पी.आर. बॉन्डवर आजी (आईची आई) ताराबाई बोऱ्हाडे मयत झाल्याचे सांगत, न्यायालयाला खोटी माहिती देऊन तात्पुरता जामीन मिळवला. परंतु, एसीबीच्या तपासात बोऱ्हाडे या जिवंत असल्याचे आणि त्या वडिलांची मावशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे न्यायालयाने लांडगे यांचा अंतरिम जामीन फेटाळून लावत त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
पोलिसांच्या वतीने बाजू मांडताना विशेष सरकारी वकील रमेश घोरपडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड परिसरात मनपाकडील वेगवेगळ्या जागेत होर्डिंग भरण्यासाठी निविदात एकूण बील रकमेच्या तीन टक्के रक्कम म्हणजेच दहा लाख रुपयांची मागणी लांडगे यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांनी केली होती.
याप्रकरणी तीन क्लार्कनेही पैशांची मागणी केली. सहा फाइल्सचे दोन टक्क्यांप्रमाणे एक लाख 18 हजार रुपये ते घेत असताना एसीबीने सापळा रचून सर्वांना रंगेहाथ जेरबंद केले. राजकीय दबावामुळे त्यांना जामीन मंजूर झाल्यास गुन्ह्यातील तक्रारदार व साक्षीदार यांच्यावर ते दबाव निर्माण करण्याची दाट शक्यता आहे.
या गुन्ह्याच्या पडताळणीत उल्लेख झालेले ते 16 जण म्हणजेच स्थायी समितीचे सदस्य यांच्याकडे चौकशी करणे बाकी आहे. त्यांच्यात व अटक केलेले पाच आरोपी यांच्यात काही रॅकेट आहे का? याबाबत पोलिसांना तपास करावयाचा आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे बाकी असल्याने नितीन लांडगे यांचा जामीन नामूंजर करण्यात यावा, अशी मागणी एसीबीच्या सहायक पोलीस आयुक्त सीमा मेहेंदळे यांनी न्यायालयात केली.