पिंपरी -सराईत गुन्हेगार असलेल्या भाच्याच्या मदतीने मावशीने तिच्या सासूचा येरवडा येथे खून करून तो मृतदेह देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-मुंबई महामार्गाच्या कडेला टाकून दिला. याप्रकरणाची गुन्हे शाखा युनिट दोनने उकल केली असून सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरोजाबाई दासा जोगदंड (वय 70, रा. येरवडा पुणे) असे खून झालेल्या सासूचे नाव आहे. याप्रकराणी एका मुन्नी नामक महिलेसह इम्तियाज उर्फ चिंट्या मुस्ताक शेख (वय , रा. ओटास्किम, निगडी) या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून शेख याला अटक केली आहे. मयत सरोजाबाई यांची मुलगी लतिका वसंत गायकवाड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुन्नी हिने मयत सासूच्या मुलासोबत आंतरधर्मिय विवाह केला होता. तिच्या पतीचा मागील काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्यानंतर सासू आरोपी सुनेला त्रास देत होती. मयताने पाच एकर जमीन विकली असून त्यातून तिला खूप पैसे मिळाले असल्याचे सुनेला समजले होते.
आरोपी चिंट्या कारागृहातून बाहेर आल्यानंतर मुन्नीने चिंट्याला सासूला मारण्यासाठी येवड्याला बोलाविले. त्यानुसार चिंट्या मावशीकडे गेला. दोघांनी मिळून मुन्नीच्या सासूला ठार मारले. त्यानंतर तिचा मृतदेह रिक्षात घालून देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकले. यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांना चिंट्या याने सरोजाबाई यांचा खून केला असून तो ओटास्किम परिसरात आहे. त्यानंतर पोलिसांनी चिंट्याला ताब्यात घेतले.