नगर -पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर दबावतंत्र वापरले जाते. पोलीस अधिकाऱ्यांसमोर आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण होते. आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली जाते. वरिष्ठ अधिकारी तहसीलदारांना म्हणतात, आमदारांचे ऐका नाही तर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल होईल. या लोकांना पैसा, सत्ता अन् पोलीस यंत्रणेचा माज चढला आहे.
आमचं काहीही होऊ शकत नाही, अशी हवा त्यांच्या डोक्यात शिरली आहे. हे उधळलेले सत्तेचे बैल असून, त्यांना वेसण घालावी लागणार आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज केली.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर देवरे आणि लंके यांचे एकमेकांवर आरोपप्रत्यारोप सुरू झाले. आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पारनेर येथे तहसीलदार देवरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, पारनेर तहसीलदारांना लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्याकडून त्रास दिला जात आहे. त्याचा कुठेतरी उद्रेक होऊन ऑडिओ क्लिप संपूर्ण महाराषट्रात व्हायरल झाली.
ती क्लिप राज्यातील प्रत्येक महिलेने ऐकली असेल. दिपाली चव्हाणपासूनची सुरुवात झाली पण, ज्योती देवरे हरणाऱ्या नाहीत तर त्या भिडणाऱ्या आहेत. एखाद्या महिला अधिकाऱ्यांची कशी कोंडी करायची, तिच्यावर कसे आरोप करायचे, तिला अशा पद्धतीने लोकप्रतिनिधिनीसमोर झुकण्यास भाग पाडायचे हा प्रयत्न पारनेरमध्ये केला गेला. तहसीलदार ज्योती देवरे आज मानसिकदृष्ट्या सावरल्या आहेत. अधिकारी महिला कर्तव्यावर असताना लोकप्रतिनिधी दबाव टाकणे, प्रशासकीय यंत्रणेणे त्यावर काही न बोलणे, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेणे हे पुरोगामी महाराष्ट्रात घडत आहे.
अफगाणिस्तापेक्षा वेगळी परिस्थिती आपल्याकडे आहे का? असा सवाल उपस्थित करून त्या म्हणाल्या, आम्ही जिजाऊ, रामाई, सावित्रीच्या लेकी आहोत. हे शब्द फक्त भाषणात घेण्यापुरते उरले आहेत. आमदार नीलेश लंके यांनी 4 ऑगस्ट रोजी लसीकरणाचे टोकण वाटप करणाऱ्या लिपिकाला मारहाण व शिवीगाळ केली. वैद्यकीय महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली, असा दावा करत ही शिवीगाळ कोणत्या अधिकाराने केली, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. महिला सशक्तीकरण, सक्षमीरणाच्या नावाने भोंब मारणार पक्ष त्या आमदार एका शब्दाने विचारत नाही.
महिलांची आई-बहीण काढायची, तिला वेश्या म्हणायचे हा अधिकार यांना कोणी दिला, याचे सत्ताधाऱ्यांनी जनतेला उत्तर द्यावे. प्रांताधिकारी सांगतात मॅडम तुम्ही लोकप्रतिनिधीचे ऐकून वागा नाही तर तुमच्यावर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल होईल. ही गंभीर बाब आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या पाठिशी उभे राहणे आवश्यक होते. पण, ते तहसीलदारांच्या पाठिशी उभे राहण्याऐवजी त्यांच्या दबाव आणित आहेत. याच दाखल घ्यावी सरकारला वाटले नाही हे दुर्दैव आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
पोलीस सत्ताधाऱ्यांच्या दावणीला
पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर कर्मचाऱ्याला मारहाण झाली. याप्रकरणी पोलीस निरीक्षकांनी साधा गुन्हा दाखल केला नाही. पोलीस निरीक्षक बळप यांच्यासमोर गौनखणिज अधिकाऱ्यांसोबतही याच पद्धतीने आमदार नीलेश लंके यांनी गैरवर्तन केल्याचा दावा करत त्याचाही अजून गुन्हा दाखल नाही. मग पोलीस काय अधिकाऱ्यांच्या मरणाची वाट पाहत आहेत का? पोलीस अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलेले आहेत, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
थोरातांनी बोटभर प्रतिक्रिया दिली नाही
आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असे तरी म्हणतील. पण राज्य सरकारने ती आशा फोल ठरविली. कारण ज्योती देवरे जिवंत आहेत. तिने आत्महत्या केली असती तर बाळासाहेब थोरात आले असते. दोन शब्द बोलले असते, अशी जहरी टीका वाघ यांनी केली.
आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असे तरी म्हणतील. पण राज्य सरकारने ती आशा फोल ठरविली. कारण ज्योती देवरे जिवंत आहेत. तिने आत्महत्या केली असती तर बाळासाहेब थोरात आले असते. दोन शब्द बोलले असते, अशी जहरी टीका वाघ यांनी केली.