काबुल – तालिबानने आज अफगाणिस्तानमधील दहाव्या प्रांताच्या राजधानीवर ताबा मिळवला. काबुलच्या नैऋत्येला 130 किलोमीटर अंतरावरच्या गझनी शहरावर तालिबान्यांनी आज ताबा मिळवला.
या भागात तालिबानने आपला झेंडाही फडकावला आहे. शहरातील प्रमुख सुरक्षा तळांवर अधूून मधून गोळीबार सुरू आहे, असे दोन स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
गझनी शहर ताब्यात घेतल्याचे दर्शवणारे काही व्हिडीओ आणि फोटो तालिबानने ऑनलाइन प्रसिद्ध केले आहेत.
अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी आणि सरकारने मात्र याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
गझनी शहराबाहेर जोरदार धुमश्चक्री सुरू झाली तेंव्हापासूनच सरकारने याठिकाणच्या घडामोडींबाबत काहीही भाष्य केलेले नाही. मात्र सुरक्षा दलांमध्ये निराशा येऊ नये यासाठी अध्यक्ष अशर्रफ घनी हे प्रयत्नशील आहेत. विशेष सुरक्षा दल, सशस्त्र नागरी दल आणि अमेरिकेच्या लढाऊ विमानांच्या पथकांचे अधिकारी यांच्याशी घनी यांची चर्चा सुरू आहे.
गझनीवर तालिबानचा ताबा येण्यामुळे राजधानी काबुलला थेट कोणताही धोका निर्माण होत नाही. मात्र ज्या वेगाने तालिबान प्रगती करत आहे ते पाहता तालिबानला आणखीन किती दिवस थोपवून ठेवता येऊ शकेल याची खात्री देता येत नाही.
आता अफगाणिस्तानमधील काही प्रमुख शहरा आणि राजधानी काबुलला वाचवण्यावरच सरकारी फौजांना लक्ष केंद्रीत करावे लागले आहे.