Bihar Politics । बिहारमध्ये विरोधी बाकांवर असणाऱ्या महाआघाडीला जुना मित्र पुन्हा मिळाला. राजद, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश असणाऱ्या त्या महाआघाडीत विकासशील इंसान पक्ष (व्हीआयपी) सहभागी झाला. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत बिहारमध्ये विरोधकांना बुस्टर मिळाला आहे.
राजद, कॉंग्रेसच्या महाआघाडीत व्हीआयपी सहभागी Bihar Politics ।
राजदचे नेते तेजस्वी यादव आणि व्हीआयपीचे प्रमुख मुकेश सहनी यांनी शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये व्हीआयपी पुन्हा महाआघाडीत सहभागी होत असल्याची घोषणा करण्यात आली. महाआघाडीचे बिहारमधील जागावाटप याआधीच जाहीर करण्यात आले. त्यामुळे नंतर एन्ट्री झालेल्या व्हीआयपीला आपल्या कोट्यातून जागा देण्याचा निर्णय राजदने घेतला. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. त्यातील २६ जागा राजदच्या वाट्याला आल्या. आता त्यातील ३ जागा तो पक्ष व्हीआयपीसाठी सोडणार आहे.
२०२० मध्ये भाजपमध्ये सामील Bihar Politics ।
मागील लोकसभा निवडणुकीवेळी (वर्ष २०१९) व्हीआयपी महाआघाडीचा घटक होता. मात्र, २०२० या वर्षाच्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी महाआघाडीची साथ सोडत व्हीआयपी जेडीयू आणि भाजपचा समावेश असणाऱ्या एनडीएत सहभागी झाला. त्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये सहनी मंत्री बनले. त्यांची विधान परिषदेवरही निवड झाली. भाजपच्या आग्रहामुळे ते घडल्याचे मानले जाते.
नंतर व्हीआयपीने उत्तरप्रदेशातील निवडणुकीत आपले उमेदवार रिंगणात उतरवले. त्या निवडणुकीच्या प्रचारावेळी सहनी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे व्हीआयपी आणि एनडीएमधील इतर पक्षांचे संबंध ताणले गेले. त्यातून सहनी यांना बिहार मंत्रिमंडळातून हटवण्यात आले. नंतर व्हीआयपीच्या सर्व ४ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे व्हीआयपी आघाड्यांच्या राजकारणात एकाकी पडला. आता तो पक्ष पुन्हा महाआघाडीचा घटक बनला आहे.