– प्रतिनिधी
औपचारिक शिक्षणाच्या चक्रातून जे बाहेर पडले किंवा ज्यांना त्या पद्धतीने कधी सामावूनच घेतले नाही त्यांच्यासाठी डॉ. चित्रा नाईक यांनी अनौपचारिक शिक्षण पर्यायाच्या प्रस्तावास चालना दिली. सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता वेगवेगळ्या वाटा शोधल्या, प्रकल्प सुरू केले.
वंचितांचे, शोषितांचे शिक्षण, बालकामगार, प्रौढशिक्षण, स्थलांतरित, अल्पसंख्याक, दिव्यांगांचे शिक्षण, ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षण समस्या यांचा त्यांनी खास अभ्यास केला. महिलांच्या शिक्षणासाठी शिवापूर येथे ग्रामीण महिला विकासिनी या केंद्राची स्थापना केली. शहरातील झोपडपट्टी आणि श्रीमंतवस्त्या यातील तफावत, शिक्षण, आधुनिक माहिती विज्ञान-तंत्रज्ञान, संगणकीय शिक्षणाच्या समस्या यांचा त्यांनी खास अभ्यास केला.
डॉ. चित्रा नाईक भारत सरकारच्या योजना आयोगाच्या जवळपास साडेसात वर्षे सदस्य होत्या. दिल्लीहून अखिल भारतीय पातळीवर बालशिक्षण ते उच्चशिक्षण अशा सर्व स्तरावरील शिक्षणाच्या गुणवत्ता विकासासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले, उपाययोजना आखल्या व त्या अंमलात आणण्यासाठी अखिल भारतीय पातळीवर त्यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रातील राज्य नियोजन मंडळाच्या सदस्य, महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालक, उच्च शिक्षण संचालक, उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या अध्यक्ष, राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या पहिल्या संचालक अशी अनेक पदे त्यांनी भूषविली.
फ्रान्स, रशिया, श्रीलंका, बांगलादेश, व्हिएतनाम, थायलंड, जर्मनी, अमेरिका आणि इंग्लंड इत्यादी देशांमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. चीन भेटीसाठी भारत सरकारने पाठविलेल्या सरकारी शिष्टमंडळाच्या त्या सदस्य होत्या. युनेस्कोच्या अनेक समित्यांवर सल्लागार असल्याने बॅंकॉक, पॅरिस येथील अनेक सभा त्यांनी गाजविल्या. पॅरिसमधील सभेत त्यांनी एज्युकेशन फॉर इंटरडिपेंडन्स अँड इंडिपेंडन्स या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी संशोधनपर लेख, पुस्तकांबरोबरच लहान मुलांसाठी, प्रौढसाक्षरांसाठी अनेक पुस्तके लिहिली.
त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार व बहुमान त्यांना बहाल करण्यात आले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार (1986) देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. जमनालाल बजाज पुरस्कार (2002), युनेस्कोचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात पहिला जॉ कोमेनियस पुरस्कार (1993) त्यांना मिळाला.
चित्रा नाईक यांचा जन्म 15 जुलै 1918 रोजी झाला. चित्रा नाईक यांनी नामवंत शिक्षणतज्ज्ञ व भारतीय शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. जे. पी. नाईक यांचेबरोबर शिष्य, पत्नी, बुद्धिजीवी, संशोधक-शिक्षणतज्ज्ञ अशा विविध भूमिकांमधून काम केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेचे अध्यक्ष (1981 ते 2010) म्हणून त्यांनी नेतृत्व केले.
चित्रा नाईक यांनी 24 डिसेंबर 2010 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला. सर्वसामान्यांच्या शैक्षणिक विकासासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला अभिवादन.