नवी दिल्ली – झोमॅटो या अन्नपुरवठा करणाऱ्या कंपनीचा आयपीओ बुधवारपासून किरकोळ गुंतवणूकदारांना उपलब्ध करण्यात आला. पहिल्या दिवशी उपलब्ध शेअरच्या 2.7 टक्के इतकी मागणी आली आहे.
आणखी तीन दिवस गुंतवणूकदारांना या कंपनीचे प्राथमिक समभाग खरेदीसाठी उपलब्ध राहणार आहेत. इंटरनेटवर आधारित स्टार्टअप कंपन्यापैकी हा महत्त्वाचा आयपीओ समजला जातो. आयपीओसाठी प्रती समभाग रु. 72 ते रु. 76 किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. समभाग खरेदीची बोली लावताना किमान 195 समभागांसाठी आणि त्यानंतर 195 च्या पटीत अर्ज करता येणार आहे.
या आयपीओद्वारे 9000 कोटी रुपये मूल्याचे नवीन समभाग विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या आयपीओ योजनेत 65 लाख समभाग पात्र कर्मचाऱ्यांकरिता विहित प्रमाणात खरेदीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. 15 टक्क्यापर्यंतचा हिस्सा प्रमाणित तत्वावर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि योजनेच्या 10 टक्क्यांपर्यंतचा हिस्सा किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदारांसाठी राखीव आला आहे.
लवकरच पेटीएम ही कंपनी आपला आयपीओ बाजारात सादर करणार आहे. या आयपीओला गुंतवणूकदार कशाप्रकारे प्रतिसाद देतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. विशेष प्रकारची रसायने तयार करणाऱ्या तत्त्वचिंतन फार्मा या कंपनीचा आयपीओ 16 जुलै ते 20 जुलै या कालावधीदरम्यान ग्राहकांना बुकिंगसाठी उपलब्ध होणार आहे.
या आयपीओची किंमत 1073 ते 1083 रुपये प्रती शेअर दरम्यान ठेवण्यात आली आहे. या माध्यमातून ही कंपनी 500 कोटी रुपये उभे करणार आहे. या रकमेचा वापर भांडवली खर्चासाठी केला जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.