पुणे – वटपौर्णिमेला चोरट्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात धुमाकूळ घालून महिलांकडील पावणेदोन लाखांचे दागिने हिसकावले. विश्रांतवाडी तसेच सासवड रस्त्यावर या घटना घडल्या.
याबाबत एका महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिला सासवड रस्त्यावरील देवाची ऊरळी गावात राहायला आहेत. तक्रारदार महिला गुरूवारी ( 24 जून) दुपारी बाराच्या सुमारास पूजन करून निघाल्या होत्या. हडपसर-सासवड रस्त्यावर सावली होम्स सोसायटीजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र आणि राणीहार असा 75 हजारांचा ऐवज हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक पी. के. हंबीर तपास करत आहेत.
विश्रांतवाडीतील धानोरी भागात महिलेचे एक लाखांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. याबाबत महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला नातेवाईकांबरोबर दुपारी सव्वाचारच्या सुमारास घरी निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीवरील चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते तपास करत आहेत.