सुमारे 150 जणांवर गुन्हा दाखल
पुणे – पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरून जमावाने खबऱ्याच्या खुनाचा प्रयत्न केला. यावेळी त्याचा बचाव करणाऱ्या पोलिसांवरच सुमारे दीडशे जणांनी हल्ला केला. यामध्ये दोन कर्मचारी जखमी झाले.
जमावात मोठ्या संख्येने महिलाही सहभागी होत्या. हा खळबळजनक प्रकार वारजेतील म्हाडा कॉलनीत घडला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी श्रीकांत दगडे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “श्रीकांत दगडे हे गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकात (1) कार्यरत आहेत. दगडे हे त्यांचा सहकारी हृषिकेश कोळप यांच्यासह मंगळवारी रात्री वारजे येथे गस्तीवर होते. यावेळी त्यांना त्यांच्या खबरीमार्फत माहिती मिळाली होती, की अभिजित खंडागळे या व्यक्तीकडे गावठी पिस्तूल आहे.
तसेच तो साथीदारासह जबरी चोरी करणार आहे. तो राहण्यास म्हाडा कॉलनी इमारत दोन येथे चौथ्या मजल्यावर राहतो. त्यानुसार ही माहिती दगडे यांनी त्यांच्या वरिष्ठांना दिली. यानंतर ते एका मित्रालासोबत घेऊन खबरी धीरज डोलारे व पोलीस म्हाडा कॉलनी येथे गेले. त्यांनी चौथ्या मजल्यावरील अभिजित याच्या घराचे दार वाजवले.
हा दरवाजा महिलेने उघडला. त्यांनी महिलेकडे अभिजितबाबत चौकशी केली. त्यावर तो बाहेर गेल्याचे महिलेने सांगितले. तोपर्यंत येथे मोठ्या प्रमाणात सोसायटीतील लोक जमले. दगडे यांना ही परिस्थिती संशयास्पद वाटली.
ते खबरीला सोबत घेऊन खाली आले. यावेळी मात्र इमारतीखाली जमाव वाढला होता. त्यातील काहींनी खबऱ्याला पाहत “तू आमच्याबाबत पोलिसांना माहिती देतो. आज तुला जिवंत सोडणार नाही,’ असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तर बांबू, विटा, सिमेंटच्या ब्लॉकने त्याला मारहाण केली. यात त्याच्या डोक्यात जबर मार लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.
दगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जमावाला “आम्ही पोलीस आहोत’ असे सांगूनही जमाव ऐकत नव्हता. यामुळे दगडे व त्यांचे सहकारी धीरजला वाचवण्यामध्ये पडले असता जमावाने त्यांनाही बेदम मारहाण केली. यातून वाट काढत या पोलिसांनी खबऱ्याला बाहेर काढले. पण, त्याला गंभीर जखम झाल्याने तत्काळ रुग्णालयात दाखल केले. हा सर्व प्रकार घडल्यानंतर त्यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दोन दिवसांनंतर तक्रार दिली गेली.
घटनेमध्ये खबरी व्यक्ती जखमी झाला आहे. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांशी जमावाने झटापट केली. सुमारे 125 ते 150 व्यक्तींवर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे.
– श्रीनिवास घाडगे (पोलीस उपायुक्त, गुन्हे)