चित्रपटसृष्टीतील थलायवा अर्थात रजनीकांत बऱ्याच दिवसांपासून फोकसमध्ये नाहीत. गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी त्यांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्या राज्यात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यांच्या लाखो चाहत्यांनी जल्लोष केला होता. दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांनी सगळ्यांना नाउमेद करणारा निर्णय जाहीर केला. आपण सक्रिय राजकारणापासून दूरच राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आणि सगळीकडे एकच उदासीनता पसरली.
अर्थात त्यांच्या चाहत्यांचे त्यांच्यावरचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. फार कमी लोकांना असे प्रेम मिळते. त्यामुळे रजनीकांत आज जगातले सगळ्यांत श्रीमंत व्यक्ती आहेत. पण श्रीमंत असले आणि लाखो चाहते असले की सगळे झाले असे होत नाही.
त्यांच्या प्रकृतीच्या काही कुरबुरी सुरू असून त्याकरता तपासण्यांसाठी ते आता अमेरिकेला रवाना झाले आहेत. रजनीकांत आणि त्यांच्या पत्नीचा काल रात्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ते चेन्नई विमानतळावर दाखल झालेले दिसत असून तेथून ते त्यांच्या खासगी विमानाने दोह्यातील कतार येथे रवाना झाले आहे.
तेथून पुढे ते अमेरिकेला जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती. तेथे त्यांच्या काही तपासण्या केल्या जाणार असून काही दिवस त्यांचा अमेरिकेतच मुक्काम असणार आहे. त्यांचे जावई धनुष त्यांची पत्नी आणि मुलांसह अगोदरच अमेरिकेत मुक्कामी आहेत.