ब्रिटनमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर मंदावलेल्या लसीकरण कार्यक्रमात आता तरुणांमुळे उत्साह संचारला आहे. देशातील ४६.६ टक्के लोकसंख्येला लस दिल्यानंतर तरूणांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. १८ ते २० वर्षीय तरुण लस घेण्यासाठी एक किमीच्या लांबच लांब रांगेत प्रतीक्षा करताना दिसून आले.
पहिल्या दिवशी सात लाखांवर लोकांनी लसीसाठी नोंदणी केली होती. ताशी सुमारे ३० हजार लोकांना डोस दिला जात आहे. या रांगेत तरुणांबरोबरच वयस्करही आहेत.लसीकरणाकडे देशातील तरुण स्वातंत्र्याच्या अर्थाने पाहू लागला आहे.
लसीकरण झाल्यानंतर कधीही क्वाॅरंटाइन होण्याची वेळ येणार नाही. कोठेही फिरता येऊ शकेल, असा विश्वास तरुणांना वाटत आहे. त्याशिवाय तिसऱ्या लाटेच्या संकटाची चर्चाही आहे. मृत्यूचा आकडा स्थिर असला तरी शनिवारी १४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
पूर्वी फायझर, मॉडर्ना, अॅस्ट्राजेनेका या लसींच तुटवडा होता. गेल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये केवळ ४.५ लाख डोस देण्यात आले होते. लसीकरणाचा वेग होता तेव्हा १२ लाखांवर डोस दिले जायचे. १८ जूनपर्यंत ७.३ कोटी डोस दिले गेले. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४.२ कोटी लोकांना पहिला डोस देण्यात आला.
३.११ कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. लसीकरणाच्या उत्पादनातून ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी दिली आहे.