सचिनच ठरला सर्वोत्तम कसोटी फलंदाज

मुंबई -मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला निवृत्त होऊन आठ वर्षे झाली आहेत. आपल्या लाडक्‍या सचिनची 21 व्या शतकातील सर्वात महान कसोटी फलंदाज म्हणून निवड झाली आहे. कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण करत असलेल्या स्टार वाहिनीने घेतलेल्या

सर्वेक्षणातून जगभरातील क्रिकेटपटू, समालोचक तसेच जाणकार यांनी मतदान केले. सचिनला श्रीलंकेच्या कुमार संगकाराने चांगलीच लढत दिली. मात्र, पुरस्कार समितीच्या सदस्यांची पसंतीही सचिनच ठरल्याने त्याने सर्वाधिक मतांच्या जोरावर हा पुरस्कार आपल्या नावे केला.

या वाहिनीने 21 व्या शतकातील सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू व कर्णधार यांची निवड केली असून, येत्या काही दिवसांत त्यांचीही नावे जाहीर केली जाणार आहेत.

या पुरस्काराच्या निवडीसाठी 50 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात विक्रमादित्य सुनील गावसकर, हरभजन सिंग, शेन वॉटसन, स्कॉट स्टायरिस, गौतम गंभीर या खेळाडूंसह जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटू, क्रीडा पत्रकार, समीक्षक यांचा समावेश आहे.

सचिनने वयाच्या 16 व्या वर्षी 1989 साली पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वयाच्या 17 व्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत त्याने पहिले कसोटी शतक साकार केले होते.

यापूर्वी 2002 साली विस्डेन या प्रसिद्ध मासिकाने सचिनची सर डॉन ब्रॅडमन यांच्या नंतरचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज व सर व्हिवीयन रिचर्डस यांच्यानंतरचा सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज म्हणून निवड केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.