मुंबई – जागतिक बाजारात सोने-चांदीचे दर वाढत आहेत. त्यानुसार भारतातही सोने आणि चांदीच्या दरात मंगळवारी मोठी वाढ नोंदली गेली.
दिल्ली सराफात मंगळवारी सोन्याचा दर 333 रुपयांनी वाढून 47,833 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर दिल्ली सराफात तब्बल 2,021 रुपयांनी वाढून 73,122 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,869 डॉलर व चांदीचा दर 28.848 डॉलर प्रति औंस झाला. एचडीएफसी सिक्युरिटीज संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात डॉलर कमकुवत होत असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढून सोन्याचे दर वाढत आहेत.
मोतीलाल ओसवाल या संस्थेचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की जागतिक पातळीवर महागाई वाढण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतातही महागाईचा दर वाढल्याची आकडेवारी काल जाहीर झाली आहे.
त्यामुळे व्याज दर वाढू शकतात अशा परिस्थितीमध्ये सोन्याची मागणी वाढत असल्यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत.