वाघोली – पुणे जिल्ह्यातील वार्षिक विकास योजना अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांनी श्री. क्षेत्र सुदुंबरे येथील श्री संत संताजी महाराज मंदिर परिसरात भक्त निवास बांधकाम करीता रक्कम रु. वीस लाख इतका निधी उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यता नुकतीच दिली असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी दिली आहे.
या कामी सुदुंबरे संस्थान चे अध्यक्ष शिवदास उबाळे , तसेच संस्थानचे सर्व पदाधिकारी व हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती तथा वाघोली गावच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांनी विशेष असा पाठपुरावा जिल्हा परिषद पुणे यांचे दफ्तरी केला होता. सुदुंबरे संस्थान चे वतीने १०० खोल्यांचे अद्ययावत असे भक्त निवास उभारण्याचा संकल्प यापूर्वीच करण्यात आलेला आहे.
त्याकामी उपरोक्त शासकीय निधीमुळे पाठबळ मिळणार असून सध्या चालू असलेल्या कोरोना महामारी चे संकट दूर झाल्यानंतर सुदुंबरे संस्थान चे वतीने नियोजित भक्त निवास बांधकाम सुरू करण्याचा मानस असून या कामी संत संताजी महाराज यांनी सुदुंबरे संस्थान पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे अविरत प्रयत्न करत असल्याचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी सांगितले.