मंचर – खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यांतील करोनाबाधित रुग्णांना तत्परतेने उपचार मिळावेत. यासाठी अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे 24 कोटी 24 लाख 46 हजार 868 रुपये खर्च करून 288 खाटांचे जम्बो कोविड सेंटर शासकीय मदत आणि लोकसहभागातून उभारणी करण्यात येत आहे.
येत्या 20 ते 25 दिवसांत प्रत्यक्षात कोविड सेंटरचा लाभ रुग्णांना होणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी (दि. 15) दिली. मंचर (ता. आंबेगाव) येथील शरद बॅंकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते.
याप्रसंगी बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा उपस्थित होते. मंत्री वळसे पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील जनतेने करोना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयावर गेल्या वर्षभरापासून जो विश्वास दाखवला आहे.
त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिसरातील रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा मिळाव्यात.
यासाठी नेहमीच आग्रही आहे. त्याचाच एक भाग म्हणून उपजिल्हा रुग्णालयात 110 ऑक्सिजन बेड, 20 बायपॅप, व्हेंटीलेटर बेड तसेच अवसरी येथील कोविड केअर सेंटर येथे 720 बेड हे सिम्प्टोमेटिक आणि 50 नॉर्मल ऑक्सिजन बेड यंत्रसामुग्री आणि इतर सोयी गेल्या वर्षापासून उपलब्ध करून दिल्या आहे.
दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता व्यवस्था अपुरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण अधिक असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सद्यस्थितीत एकाच घरातील अनेक जण बाधित होत असल्याने खासगी रुग्णालयामध्ये होणारा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड परिसरात हॉस्पिटलयुक्त आरोग्य सुविधा वाढविण्याची गरज आहे.
त्याचाच भाग म्हणून शासकीय विद्यालय अवसरी खुर्द येथील मुलींच्या दोन वसतिगृहामध्ये सुसज्ज असे 288 बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल ज्यामध्ये 240 ऑक्सिजन बेड, 48 आयसीयू बेड, 40 व्हेंटीलेटर, लहान मुलांच्या उपचारासाठी डॉक्टर्स या सुविधेसह सेंटर सुरू करण्यासाठी प्रशासनास सूचना दिल्या आहेत.
सव्वाचोवीस कोटी होणार खर्च
24 कोटी 24 लाख 46 हजार 868 रुपये खर्चामध्ये 11 कोटी 60 लाख 40 हजार आपत्ती व्यवस्थापनाकडून 11 कोटी 69 लाख जिल्हा नियोजन मंडळाकडून आणि सीएसआर फंडातून 94 लाख 65 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.
या हॉस्पिटलसाठी परिसरातील दानशूर व्यक्तींच्या वतीने 34 व्हेंटीलेटर आणि इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.
परिसरातील दानशूर आणि प्रतिष्ठीत नागरिक आणि गावे यांनी पुढे येवून आवश्यक त्या स्वरुपात मदतीचा हात आरोग्य विभागाला दिला पाहिजे.