पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पदवी आणि पदव्युत्तरच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा पुढच्या महिन्यात होणार आहेत. दि.15 जूनपासून टप्प्याटप्प्याने याबाबत नियोजन करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी झाली. त्यात दुसऱ्या सत्रातील परीक्षा घेण्यावर चर्चा झाली. त्यानंतर या परीक्षा 15 जूनपासून टप्प्याटप्प्याने घेण्यावर एकमत झाले. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून, त्याची रूपरेषा परीक्षा विभागाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे. त्यातच करोनाचा प्रादुर्भावामुळे महाविद्यालये आणि विद्यापीठ बंद आहेत. अशा परिस्थितीत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी प्रथम सत्र परीक्षा एप्रिलपासून घेण्यात येत आहे. यावेळी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींविना परीक्षा देता आली. ही परीक्षा ऑनलाइन आणि प्रॉक्टर्ड पद्धतीने घेण्यात विद्यापीठाला यश आले आहे.
दरम्यान, प्रथम सत्राची परीक्षा जवळपास पूर्ण होत आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्रातील परीक्षाही लवकर घेण्याची मागणी विद्यार्थ्यांतून होत होती. त्यादृष्टीने विद्यापीठाने दुसऱ्या सत्रातील परीक्षेचे नियोजन करण्याचे काम हाती घेतले होते. त्यानुसार या परीक्षा 15 जूनपासून सुरू होणार असल्याने त्यानुसार विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य होणार आहे. दरम्यान, दुसऱ्या सत्रातील सर्व अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकविणे पूर्ण झाले का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा 15 जूनपर्यंत
करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापनात मिळालेले गुण महाविद्यालयाकडून प्राप्त झाल्याशिवाय निकाल जाहीर करता येत नाही. त्यामुळे महाविद्यालयांनी दि. 15 जूनपर्यंत प्रात्यक्षिकांची परीक्षा घ्यावी. त्याचे गुण दि. 25 जूनपर्यंत विद्यापीठाकडे सादर करावेत, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
परीक्षा मंडळाच्या बैठकीत दुसऱ्या सत्राच्या परीक्षा जूनमध्ये घेण्याचा निर्णय झाला. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज व शुल्क भरणे, त्यासंबंधी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची माहिती जितक्या लवकर परीक्षा प्राप्त झाल्यास दुसऱ्या सत्रातील परीक्षा लवकर घेणे शक्य होणार आहे. सध्याचा विचार करता जूनच्या तिसऱ्या आठवड्यात ही परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे.
डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ