पुणे – महापालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयातील रुग्णांचे चोचले नातेवाईक आणि मित्रांकडून गुपचूप पुरवले जात आहेत. त्यासाठी तस्करांप्रमाणे या रुग्णांना तंबाखू, सिगारेट, दारू तसेच गुटखा पुरवला जात आहे. रुग्णांना घरून जेवण देण्याच्या नावाखाली हा प्रकार सुरू आहे. येथे मांसाहारास बंदी असल्याने रुग्णांचे नातेवाईक डब्यातून गुपचूप तसे पदार्थ पुरवत आहेत. त्यामुळे संबंधित रुग्णांच्या आरोग्य आणि उपचारावरही गंभीर धोका निर्माण झाला आहे.
सीओईपी मैदान येथील जम्बो कोविड हॉस्पिटल येथे सुमारे 700 बेड्सची सुविधा आहे. त्यात 600 ऑक्सिजन बेड आहेत. येथे पालिकेकडूनच शाकाहारी जेवण दिले जाते. येथे रुग्णांना तंबाखू, गुटखा, दारू, सिगारेट, पान खाण्यास बंदी आहे. त्यामुळे या रूग्णांना नातेवाईक अथवा मित्रांकडून या घटकांचा पुरवठा सुरू आहे. त्यासाठी या रुग्णांकडून महापालिकेचे जेवण चांगले नसल्याचे तसेच वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी करत घरून जेवण मागवत आहेत. हे जेवण घरून आल्यानंतर रुग्णांना देण्यास उशीर होत आहे.
त्यामुळे अनेक नातेवाईकांनी पालिका प्रशासनाकडे जम्बोच्या व्यवस्थापनाबाबत तक्रारी केल्या. यावर पालिकेने विचारणा केली असता; पिशवीमध्ये वेगळा कप्पा शिवून तसेच डब्यात जेवणाच्या आत या वस्तू लपवून पाठवल्या जात आहेत. त्यामुळे प्रत्येक डब्याची कसून तपासणी केली जाते. त्यामुळे जेवण देण्यास उशीर होत असल्याचे महापालिकेस कळवण्यात आले. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
“आयसीयू’मधील रुग्णाला आणून दिले मद्य
जम्बो रुग्णालयातील आणखीएक धक्कादायक बाब म्हणजे, “आयसीयू’मधील रुग्णाने येथील सफाई कर्मचाऱ्याला हाताशी धरून चक्कमद्य मिळवल्याचे समोर आले आहे. ही बाब निदर्शनास येताच; तातडीने या कर्मचाऱ्यास निलंबितही करण्यात आले आहे, तर एका रुग्णासाठी चाकू, तर आणखी एकासाठी सुपारी कातरण्याचा अडकित्ता लपवून पाठवण्याची बाब वेळीच तपासणीत समोर आली आहे.
नॉनव्हेजचाही पुरवठा
रुग्णांच्या जेवणाच्या डब्यांची तपासणी केली असता, अनेक रुग्णांचे नातेवाईक शाकाहारी जेवणाच्या डब्यात चिकनकरी, मटणकरी, बिर्याणी असे पदार्थ रुग्णांना पाठवत आहेत. या शिवाय सिगारेटही पाठवण्यात येत आहे. एखाद्या रुग्णाने सिगारेट ओढल्यास आणि निष्काळजीपणे ते थोटक इकडे-तिकडे फेकल्यास आग लागण्याचा धोकाही आहे.
जेवणाच्या नावाखाली तक्रारी करून काही रुग्ण असे गैरप्रकार करत आहेत. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना घरून जेवण आणण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र, त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. अशा रुग्णांना उपचारांऐवजी याच घटकांची काळजी असेल, तर त्याबाबत प्रशासनाकडून कडक निर्णय घेतला जाईल. या प्रकारांमुळे इतर रुग्णांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, मनपा