तळेगाव दाभाडे – तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एक जण जखमी झाला असून, याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर सव्वा लाख रुपये दे’ अशी मागणी करत एका मोटार चालकाने मराठी अभिनेता योगेश सोहोनी याला “एटीएम’मधून 50 हजार रुपये जबरदस्तीने काढण्यास लावून लुटले. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सोमाटणे एक्झिटजवळ शनिवारी (दि. 8) सकाळी ही घटना घडली.
याबाबत अभिनेता योगेश माधव सोहोनी (वय 32, रा. मुंबई) यांनी सोमवारी (दि. 10) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका स्कॉर्पिओ मोटार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता योगेश सोहोनी शनिवारी सकाळी त्यांच्या मोटारमधून मुंबईहून पुण्याला येत होते. सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास सोमाटणे एक्झिटजवळ एका पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ आली. स्कॉर्पिओ चालकाने सोहोनी यांना हात दखाबून थांबण्यास सांगितले. त्यामुळे सोहोनी यांनी मोटार थांबवली.
स्कॉर्पिओमधून एक व्यक्ती उतरला आणि सोहोनी यांच्याकडे आला. “तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. एका इसमाला दुखापत झाली आहे. या अपघाताची कायदेशीर तक्रार पोलिसांकडे करायची नसेल तर तू एक लाख 25 हजार रुपये दे. नाहीतर तुझ्यावर पोलीस केस होईल.’ अशी आरोपीने सोहोनी यांना धमकी देऊन पैशांची मागणी केली.
सोमाटणे फाटा येथील एटीएमजवळ नेऊन सोहोनी यांना 50 हजार रुपये काढण्यास भाग पाडले. सोहोनी यांनी एटीएममधून पैसे काढले असता ते पैसे जबरदस्तीने घेऊन आरोपी स्कॉर्पिओ चालक पळून गेला.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.