लॉकडाऊनच्या परिस्थितीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी एकमेकांची मदत करण्यासाठी एकजूट दाखवत आहेत. सोनू सूद, सलमान खान, प्रियांका चोप्रा यांच्यासह अनेक कलाकार मंडळी आपापल्या परीने मदत कार्य करत आहेत.
जॅकलीन फर्नांडिस आणि सनी लिओन यांनीही असाच पुढाकार घेतला आहे. गरजवंतांना जेवण पुरवण्यासाठी जॅकलीनने “योलो फाउंडेशन’ची स्थापना केली आहे, तर दुसरीकडे सनी लिओनने “पेटा’च्या बरोबर मिळून प्रवासी मजुरांना जेवण पुरवण्याची व्यवस्था केली आहे.
गरजवंतांना जेवण पुरवण्याच्या कामात स्वतः जॅकलीन फर्नांडिस सहभागी झाली होती. फूड स्टॉलवर उभे राहून तिने गरजू लोकांना जेवणाचे वाटप केले. त्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.
जर खऱ्या अर्थाने शांतता हवी असेल, तर व्यक्तीच्या पोटात अन्न जायला पाहिजे, असे मदर तेरेसा म्हणत होत्या, अशी कॅप्शन जॅकलीनने लिहिली आहे. जॅकलीनच्या “योलो फाउंडेशन’च्या वतीने मास्क आणि सॅनिटायझरचे वाटपदेखील केले जाणार आहे.
सनी लिओननेदेखील दिल्लीतील 10,000 प्रवासी कामगारांना भोजन पुरवण्यासाठी “पीपल्स फॉर इथनिक ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स’ अर्थात “पेटा’ बरोबर सहकार्य केले आहे. या दोघींच्या कामाचे नेटिझन्सकडून खूप कौतुक केले जात आहे.