वाई (प्रतिनिधी) – कवठे ता. वाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारतीमध्ये कोविड सेंटर गतवर्षीपासून सुरु करण्यात आले होते. या आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक अवस्थेतील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत होते.
सध्या या आरोग्यकेंद्रामध्ये ३० बेड्स उपलब्ध असून या ठिकाणी कोरोनो रुग्णांवर चांगल्या पद्धतीने देखभाल करण्यात येत होती. मात्र हे केंद्र कोरोना केअर केंद्र असल्याने जर या ठिकाणी दाखल झालेला रुग्ण अत्यवस्थ होऊ लागला व त्याची ऑक्सिजन पातळी खालावू लागली तर त्याला पुढील उपचारासाठी तातडीने वाई किंवा सातारा येथील शासकीय किंवा खाजगी कोविड केंद्रामध्ये दाखल करावे लागत होते.
यामध्ये पेशंटला ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी दवाखान्याच्या उपलब्घतेपासून ते ऑक्सिजन बेडपर्यंत रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना तसेच लोकप्रतिनिधींनासुद्धा सद्यपरिस्थितीत तारेवरची कसरत करावी लागत होती. तालुक्यातील कित्येक रुग्ण एक-दोन दिवस ऑक्सिजन बेडच्या प्रतीक्षेत असल्याचे सध्याचे चित्र होते. याबाबत असंख्य लोकांनी लोकप्रतिनिधींच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येनुसार ऑक्सिजन बेडची कमतरता भासू लागल्याने हि बाब आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये मांडण्यात आली व त्यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद फंडातून कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ३० ऑक्सिजन बेडसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला.
तातडीने या आरोग्य केंद्रात रात्रंदिवस युद्धपातळीवर ऑक्सिजन लाईन टाकण्याचे काम सुरु करण्यात आले व दिनांक २७ रोजी आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते या ऑक्सिजनबेड सुविधेचे उदघाटन करण्यात आले. कवठे येथे ३० ऑक्सिजन बेड उपलब्ध होत असल्याने तालुक्यातील व जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची गरज असलेल्या रुग्णांसाठी हि दिलासादायक बाब ठरली आहे.
वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, माजी कृषी सभापती मनोज पवार, खंडाळा पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे , वाईचे तहसीलदार रणजित भोसले, खंडाळा तालुक्याचे तहसीलदार दशरथ काळे, वाई नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल सावंत,वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय कुसुरकर, शशिकांत पिसाळ, मदन भोसले, महादेव मस्कर, शशिकांत पवार, दिलीपराव पिसाळ, उपसभापती भैय्या डोंगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी संदीप यादव यांच्या उपस्थितीत या बेड्स सुविधेचे उदघाटन करण्यात आले.
कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या पहिल्या मजल्यावर उपलब्ध असेलेल्या ३० बेड्सना ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून दिली असल्याने आरोग्य यंत्रणेचा ऑक्सिजन बेड मिळविण्याचा बहुतांश ताण कमी होईल तसेच या आरोग्यकेंद्राच्या दुस-या मजल्यावर आणखी ३० बेड्स उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
– आमदार मकरंद पाटील