नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले असल्याचे समोर आले आहे. एकनाथ गायकवाड यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. एकनाथ गायकवाड हे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते.
माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना करोनाची लागण झाल्यानंतर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असतानाच बुधवारी सकाळी १० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राजकीय कारकीर्द
एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. जोशींचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. एकनाथ गायकवाड हे काँग्रेसकडून दोनवेळा संसदेवर निवडून गेले होते. ते १४ व्या आणि १५ व्या लोकसभेचे खासदार होते. गायकवाड यांनी मुंबई दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी पराभूत केले होते. गायकवाड हे धारावी मतदारसंघातून तीनवेळा विधानसभेत निवडून गेले होते. तर दोनवेळा राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद भूषविले होते.
राजकीय नेत्यांनी ट्विट करत वाहिली श्रद्धांजली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन दुःखदायक आहे. वंचित व उपेक्षित समाजांचे शैक्षणिक उत्थान व सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून त्यांनी अथकपणे आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहसंवेदना व भावपूर्ण श्रद्धांजली!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 28, 2021
माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. काँग्रेसचा विचार मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात गायकवाड साहेबांचा सिंहाचा वाटा होता. गायकवाड कुटुंबीयांच्या दुःखात राष्ट्रवादी परिवार सहभागी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/WqoaK1cIQM— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 28, 2021
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. संवेदनशील आणि लोकांच्या सामाजिक उत्थानासाठी झटणारा नेता अशी गायकवाडजींची ओळख होती. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) April 28, 2021
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माझे जुने सहकारी एकनाथ गायकवाड जी यांचे आज निधन झाले.ही बातमी अत्यंत दुःखदायक आहे.
आम्ही सर्वजण @VarshaEGaikwad जी व त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली!#EknathGaikwad pic.twitter.com/FqEFDJlUgH— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 28, 2021
ज्येष्ठ नेते, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खा. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे निष्ठावान, अनुभवी व लोकप्रिय नेतृत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!💐
या कठिण प्रसंगी आम्ही सर्व गायकवाड कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.. pic.twitter.com/NoY6me7C7L— Balasaheb Thorat (@bb_thorat) April 28, 2021
माझी मैत्रीण तथा विद्यमान मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडिल तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त करते, त्यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली…! माझं आयसोलेशन पुर्ण झाल्यानंतर वर्षा गायकवाड यांची भेट घेईल.@VarshaEGaikwad
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 28, 2021
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खा. एकनाथजी गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले.
त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
त्यांच्या कन्या मंत्री वर्षाताई गायकवाड, अन्य कुटुंबीय यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 28, 2021