पुणे,दि.28 – तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावे खंडणी व पैसे मागितल्याची माझ्याविरुद्धची तक्रार खोटी असून या संदर्भात शासन आणि माध्यमांनी माझी बाजू ऐकून न्याय द्यावा,या प्रकरणी षड्यंत्र करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसहित रॅकेट मधील सर्वांवर तातडीने कारवाई करावी ‘अशी मागणी निवृत्त पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत केली.याच आशयाचे निवेदन त्यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना पाठवले आहे
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे बुधवारी दुपारी ही पत्रकार परिषद झाली.यावेळी धनंजय धुमाळ यांच्या समवेत त्यांचे वकील एड.रमेश जाधव उपस्थित होते.
धनंजय धुमाळ म्हणाले,’तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावाने संदीप जाधव(रा.वीरभद्र सोसायटी ,बाणेर ,पुणे ) यांच्याकडून 25 लाख मागितल्याच्या खोट्या आरोपाखाली माझ्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती आणि निलंबन करण्यात आले होते या प्रकरणातील ऑडियो,व्हिडीओ रेकोर्डिंग सारखे पुरावे बनावट आणि फेरफार केलेले होते मात्र मूळ रेकोर्डिंग ज्या स्पाय कॅमेरा ,इलेक्ट्रोनिक साधनांचा वापर करून केले होते ,तो मूळ पुरावा प्राथमिक चौकशी अधिकारी यांनी न मिळवता बनावट रेकॉर्डिंगच्या आधारावर चौकशी आणि कारवाई करण्यात आली. त्याच बनावट सीडीज व बनावट तक्रारीच्या आधारे कोणत्याही प्रकारची सत्यता पडताळून न पाहता सध्या पुन्हा बातम्या प्रसारित करण्यात आल्या.
त्यामुळे माझी,कुटुंबियांची, महाराष्ट्र पोलीस दलाची व पर्यायाने महाराष्ट्र शासनाची बदनामी झाली. माझी अपिलीय सुनावणी लवकरात लवकर करण्यात यावा यासाठीचा पत्रव्यवहार हा कोविड साथीमुळे वेळेत पूर्ण न झाल्याने नाईलाजाने मला स्वतःलाच स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.
प्रत्यक्षात मी शिशिर कोशे,यांच्या जमीनीवर संदीप जाधव व हेमंत गांधी यांनी पोलिसांच्या मदतीने बेकायदेशीर ताबा मारल्याची आलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी करीत होतो.संजय मुथा याच्या कागदपत्रांचा वापर करून 30 वर्षा पुर्वी टाटा मोटर्स कंपनीच्या लोकांनी घेतलेल्या जमिनीवर ,प्लॉटवर संदीप जाधव ,हेमंत गांधी यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने जमिनींचा ताबा बेकायदेशीर रित्या घेतला होता.
त्यातील एक प्लॉट हा तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी आपल्या पत्नीच्या नावावर संदीप जाधव आणि हेमंत गांधी यांच्या कडून घेतला .त्या जमिनीची सरकारी किमत 90 लाख तर बाजारभावा प्रमाणे किमत 4 ते 5 कोटी रुपये होती,याचीही चौकशी करावी.
शिशिर कोसे याच्या तक्रारीनांतर पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार संदीप जाधव ,हेमंत गांधी यांची चौकशी करीत होतो.यावेळी मी पुणे शहर गुन्हे शाखा (प्रॉपर्टी सेल ) येथे कार्यरत होतो . त्यामुळे आकसाने चौकशी दरम्यान झालेल्या चर्चेचे संदीप जाधव यांनी बनावट रेकॉर्डिंग चे पुरावे सादर करून माझ्याविरुद्ध 25 लाख मागितल्याची तक्रार आयुक्तांकडे केली होती.
यामध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील पवार,अरुण सावंत आणि सुरेश मिरगे यांच्या सहभागाचीदेखील चौकशी व्हावी. तसेच संदीप जाधवच्या जमिनींचे पोलीस दलात कोण कोण लाभार्थी आहेत ,हे शोधून काढावे ,अशी मागणीही त्यांनी केली आहे .