होम आयसोलेट व्यक्तींसाठीही वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला
पुणे – करोनाची बाधा झाल्यावर सुमारे 5 टक्के रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्यांनी या ऑक्सिजनच्या पातळीकडे लक्ष दिले पाहिजे, त्याची दैनंदिन नोंद ठेवली पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
करोनाची लागण झाल्यानंतर अनेक लक्षणांबरोबरच काही रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी खालावण्याची लक्षणे दिसतात. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर लगेचच हे लक्षण दिसत नाही, परंतु ज्या रुग्णांना न्यूमोनिया होतो त्यांच्यामध्ये ऑक्सिजनची पातळी खालावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते.
करोनाचा संसर्ग झाल्यावर साधारणपणे दुसऱ्या आठवड्यात न्यूमोनियाची लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे फुफ्फुसाला सूज येऊन शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागते. सगळ्याच बाधितांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे दिसत नाहीत. परंतु उशिरा उपचाराला सुरुवात किंवा दुर्लक्ष यामुळे बाधितांमधील किमान 10 टक्के रुग्णांना न्यूमोनिया होतो. त्यातील 5 टक्के रुग्णांची ऑक्सिजनची पातळी खालावलेली दिसून येते.
बाधित व्यक्ती पाठीवर झोपल्याने ऑक्सिजनची पातळी वाढते, कंट्रोलमध्ये येते असे म्हटले जाते; परंतु सगळ्यांच्या बाबतीतच ते होईल असे नाही. ज्यांची ऑक्सिजनची पातळी खालावली आहे त्या रुग्णांना “ऍक्टिव्ह’ आणि “पॅसिव्ह’ फिजिओथेरपी दिली जाते.
पण, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य असेल किंवा कोविड न्यूमोनियाची लक्षणे नसतील, अशा बाधितांना या थेरपीची गरज नसते. त्याऐवजी त्यांनी होम आयसोलेशनमध्ये असताना मोकळ्या जागेत जास्तीत जास्त चालणे, प्राणायाम, अनुलोम-विलोमसारखे श्वसनाचे व्यायाम करून आणि मोकळ्या हवेत राहून आरोग्याची काळजी घेऊ शकतात, असे काही तज्ज्ञांनी सुचवले आहे.
“आयसीएमआर’च्या मते…
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक नियमांनुसार, शांत बसल्यानंतरही शरीरातील ऑक्सिजन पातळी 94 च्या खाली असेल, तसेच काही पावले चालल्यावर रुग्णाला खूप धाप लागत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल होण्याचा विचार केला पाहिजे.
तज्ज्ञ म्हणतात…
करोनाचा संसर्ग झाल्यावर साधारणपणे पहिल्या आठवड्यात ताप, अंगदुखीसारखी लक्षणे जाणवतात. दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजे सातव्या, आठव्या दिवशी फुफ्फुसांत कोविड न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. तो वाढत नाही ना, हे तपासण्यासाठी शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीची रोजच्या रोज नोंद ठेवणे आवश्यक आहे. दिवसातून तीन वेळा शरीरातील ऑक्सिजनच्या नोंदी घ्याव्यात, तसेच तीन मिनिटे चालण्याचा व्यायाम करून त्यानंतरही शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण पाहावे. बेसलाइन रीडिंग आणि चालण्याचा व्यायाम केल्यावरचे रीडिंग यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असेल, तर लगेचच डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते.