सातारा – सातारा शहरात एक हजार 621 पात्र फेरीवाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेरीवाल्यांसाठी जाहीर केलेली दीड हजार रुपयांची मदत आणि सातारा पालिकेच्या स्वनिधीतून एक हजार रुपये, अशी अडीच रुपये मदत पात्र फेरीवाल्यांना देण्यात येणार असल्याची घोषणा खा. उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सातारा शहरातील पात्र फेरीवाल्यांना मदत करण्यात पालिका कमी पडणार नाही. शहरातील एक हजार 621 विक्रेत्यांचे सर्वेक्षण पूर्वीच झाले आहे. त्यातील 754 विक्रेत्यांना पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेतून दहा हजारांची रक्कम यापूर्वीच देण्यात आली होती. उर्वरित 867 फेरीवाल्यांची मंजूर प्रकरणे अनुदानप्राप्तीसाठी प्रलंबित आहेत.
आता राज्यातील लॉकडाऊनच्या काळात फेरीवाल्यांना राज्य शासनाकडून दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रक्कम तुटपुंजी असली तरी दिलासा देणारी आहे. म्हणूनच या रकमेत पालिकेच्या निधीतून एक हजार रुपये देण्याचे खा. उदयनराजेंनी जाहीर केले आहे. ही अडीच हजार रुपयांची मदत फेरीवाल्यांच्या बॅंक खात्यांवर लवकरच जमा होईल, अशी अपेक्षा आहे. कोणतीही पात्र व्यक्ती या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजेंना टोला
फेरीवाल्यांबद्दल असलेल्या सहानुभूतीमुळे टीका करणाऱ्यांनी थोडी माहिती घेतली असती, तरी त्यांना वस्तुस्थिती समजली असती, असा टोला या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना लगावण्यात आला आहे. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे फेरीवाल्यांचे नुकसान होणार असल्याच्या टीकेचे उदयनराजेंनी खंडन केले आहे. शहरातील फेरीवाले व गोरगरीब आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत.
पात्र फेरीवाल्यांना लाभ देण्यात आम्ही कमी पडणार नाही. आपत्कालीन स्थितीत टीका करणाऱ्यांना नीट माहिती मिळाली असती, तर त्यांनी टीका केली नसती. त्यांची टीका आम्ही सकारात्मकतेने घेत असल्याचे उदयनराजेंनी पत्रकात नमूद केले आहे.