- व्यापारी म्हणतात पोलिसांनी दिली परवानगी
- पोलिसांकडून मात्र नकार
पिंपरी – गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हे सण सलग मंगळवारी आणि बुधवारी असल्याने विकेंड लॉकडाऊननंतर सोमवारी (दि. 12) पिंपरी बाजारपेठ गर्दीने फुलली होती. तसेच पुढील काही दिवसांमध्ये कडक लॉकडाऊन लागण्याच्या शक्यतेने बाजारात मोठी गर्दी उसळली होती. पोलिसांनी परवानगी दिल्याने दुकाने उघडण्यात आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तथापि, दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
शनिवार आणि रविवारी “विकेंड लॉकडाऊन’ होता. तर, सोमवार ते शुक्रवार जीवनावश्यक वस्तू विक्रीला परवानगी आहे. त्यामुळे त्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू विक्रीशिवाय अन्य दुकानांना खुले ठेवण्यास परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. पर्यायाने, दुकाने खुली करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी पिंपरी मर्चंट फेडरेशनतर्फे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. कामगारांचे पगार, वीजबिल, मिळकतकर, बॅंकांचे हप्ते, दुकानाचे भाडे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आम्ही कसा भागवायचा, असे विविध प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केले होते. त्यांनी याच्या विरोधात पिंपरी बाजारपेठेत निदर्शने देखील केली होती. तसेच, सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा पवित्रा घेतला होता.
मंगळवारी गुढीपाडवा सण आहे. त्यानंतर बुधवारी डॉ. आंबेडकर जयंती आहे. त्यामुळे आज पिंपरी बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू विक्रीबरोबरच कापड आणि मोबाइल विक्रीची दुकाने सुरू झाली होती. सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत ही दुकाने खुली होती. बाजारपेठेतील काही दुकानदारांनी मात्र दुकाने बंद ठेवली होती. तर, काही दुकानदारांनी अर्धवट दुकाने उघडून विक्री सुरू ठेवली होती. राज्य सरकारकडून पुढील काही दिवसांमध्ये लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता असल्याने आज बाजारपेठेमध्ये आवश्यक साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
पिंपरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना दुकाने खुली करण्यास परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे ज्यांनी दुकाने सुरू केली होती, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
– मिलिंद वाघमारे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे