पुणे – शहर तसेच उपनगरांत शनिवारी (दि. 10) सकाळपासून कडक ऊन जाणवत होते. मात्र, दुपारनंतर वातावरण बदलून ढगाळ वातावरण तयार झाले, तर काही ठिकाणी पावसाचा हलकासा शिडकाव देखील झाला. दरम्यान, विभागातर्फे पुढील चार दिवस (दि.14) पुण्यासह संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शहर परिसरात मार्च महिन्याच्या शेवटापासून तापमानाच चांगलीच वाढ झाली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये पूर्वेपासून उत्तरेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र आणि वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने वातावरणात काहीसा बदल होऊन तापमानात कमाल तापमानात घट नोंदविण्यात आली आहे.
विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या विदर्भ ते तामिळनाडूच्या अंतर्गत भागापर्यंत उत्तर-दक्षिण असलेला कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण-पश्चिम मध्यप्रदेश ते कॉमोरीन क्षेत्र आणि लगतचा भाग या दरम्यान असून, मराठवाडा- मध्यमहाराष्ट्र-कर्नाटक -केरळ हा मार्ग त्याने व्यापला आहे. परिणामी, राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून, 10 ते 14 एप्रिल या दरम्यान राज्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज विभागाने वर्तविला.
शहर परिसरात शनिवारी संध्याकाळी पौड रस्ता, हडपसर, मांजरी, धायरी, सिंहगड रस्ता, वारजे, शिवणे, उत्तमनगर, खडकवासला तसेच पेठांचा परिसर अशा अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपातील पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडला. दरम्यान शहरात कमाल तापमान 37.7 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22.1 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.