करोनाचा नायनाट होणार ? ‘या’ स्प्रेने जगाच्या आशा पल्लवीत, दोन देशात वापर सुरू

लंडन – करोनापुढे संपूर्ण जग हतबल झाले असताना आणि लसींच्या परिणामकारकतेबाबत शंका उपस्थित केली जात असताना जगवासियांना कदाचित दिलासा मिळू शकेल अशी एक बातमी आली आहे. आमचा नाकाद्वारे दिलेला स्प्रे या मार्गाने शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूंपासून बचावासाठी उपयुक्त ठरला असल्याचा दावा कॅनडातील एका कंपनीने केला आहे.

सॅनोटाइज रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असे या बायोटेक कंपनीचे नाव आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार करोना विरूध्दचा लढा जिंकण्यात या स्प्रेची मोठी मदत होणार असल्याचे आतापर्यंतच्या चाचण्यांत आढळून आले आहे. त्यांचा हा नाइट्रीक ऑक्‍साइड नेझल स्प्रे (एनओएनएस) विषाणूची तिव्रता कमी करतो आणि अगोदरच बाधित झालेल्या रूग्णालाही मोठा दिलासा देतो असे आढळून आल्याचे सांगण्यात आले. न्यूझीलंड आणि इस्त्रायल या देशांनी अगोदरच त्याच्या वापराला परवानगी दिली आहे.

ज्या रूग्णांवर स्प्रेची चाचणी घेण्यात आली त्यात असे आढळून आले की, स्प्रेच्या वापरानंतर पहिल्या 24 तासांत विषाणूचा व्हायरल लोड 95 टक्के तर 72 तासांत 99 टक्के कमी झाला. कॅनडात 7 हजार जणांवर याची क्‍लिनिकल चाचणी घेण्यात आली व त्यापैकी कोणालाही आरोग्याची कोणती गंभीर समस्या उदभवली नसल्याचे सांगण्यात आले. करोनाच्या विरोधातल्या लढ्यात हा स्प्रे अत्यंत उपयुक्त अशी बढत देणार असल्याचे डॉ. स्टिफन विंचेस्टर यांनी म्हटले आहे. सॅनोटाइजने या स्प्रेच्या आपत्कालीन वापरसाठी ब्रिटन आणि कॅनडात अर्ज केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.