“तुकाराम तुकाराम’च्या नामघोषात नांदूरकी वृक्षावर तुळशीपाने, पुष्पांची उधळण
– रामकुमार आगरवाल
देहूगाव – घोटविन लाळ ब्रम्हज्ञान्यां हाति।
मुक्त आत्मस्तुती सांडविन ।।
तीर्थक्षेत्र देहू वैकुंठस्थान परिसरात लाखो भाविकांच्या उपस्थित होणारा श्री संत तुकाराम बीज सोहळा यंदा प्रथमच मर्यादित लोकांच्या उपस्थित संपन्न झाला. “वाढवेळ झाला उभा पांडूरंग…’ महाराजांच्या प्रयाणाचा अभंग होताच “तुकाराम तुकाराम’चा नामघोष करीत उपस्थितांनी नांदूरकीच्या वृक्षावर तुळशीपाने, पुष्पांची उधळण केली. 373 वा बीज सोहळा श्रीक्षेत्र देहूत मंगळवारी (दि. 30) पार पडला.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांचे तीर्थक्षेत्र देहूत आगमन होत असते. वाढत्या करोनाच्या प्रादुर्भावाने भाविकांची, नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षितता व आरोग्याची दक्षता घेत यंदा शासनाने बीज सोहळा संपन्न करण्यावर निर्बंध घातल्याने मर्यादित भाविकांच्या उपस्थित सोहळा संपन्न करण्यात आला. परिसरामध्ये जमावबंदी, संचारबंदी लागू केल्याने तसेच दुकाने बंद ठेवल्याने शुकशुकाट होता.
तीर्थक्षेत्र देहूत येणाऱ्या सर्व मार्गावर नाकाबंदी केल्याने, शासनाला सहकार्य करीत आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थानने भाविकांना, वारकऱ्यांना देहूत न येण्यास आवाहन केल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांनी सोहळ्यास न येता घरीच थांबले होते. तुळशी, बेलपान, फुले, खेळणी, छायाचित्र, धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजनाची पुस्तके, कॅलेंडर, ओडिओ, व्हिडीओ सीडी, रसवंती गृहे, अल्पोपहार, विविध साहित्यांची दुकाने थाटण्यास मज्जाव केल्याने यात्रेचे प्रथमच स्वरूप दिसून आले नाही.
भजन, कीर्तन, हरिपाठाचे सप्ताह, चिपळ्या, वीणा, टाळ-मृदंगाचे निनाद, हरि नामाचा जय घोषाने भक्तीमय रसात न्हाऊन निघणारा परिसरात शांतता होती. पोलिसांचा बंदोबस्त तैनात असल्याने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त होते.
पहाटे 3 वाजता “श्रीं’च्या मुख्य मंदिरात काकड आरती, पहाटे 4 वाजता “श्री’ची महापूजा, शिळा मंदिर महापूजा, श्री विठ्ठल-रखूमाई, पालखी सोहळ्याचे जनक, तपोनिधी नारायण महाराज समाधीची महापूजा श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप मधुकर महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संतोष महाराज मोरे आदींच्या हस्ते करण्यात आली.
पहाटे 6 वाजता श्री संत तुकाराम महाराज व “श्रीं’ची महापूजा वैकुंठगमन स्थान (गोपाळपुरा) येथे संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त यांच्या उपस्थित महाराजांच्या वंशजांच्या हस्ते करण्यात आली. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मुख्य मंदिरामध्ये पालखीचे दर्शन घेतले.
सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुख्य मंदिरातून पालखीचे प्रस्थान झाले. मोजक्याच भाविकांच्या उपस्थित टाळकरी, चौघडे, नगारे, अब्दागिरी, चौरी, गरुडटके, जरीपटके, चोपदार, संस्थानचे आजी-माजी अध्यक्ष, विश्वस्त, महाराजांचे वंशज, नगारा वादक दिनेश पांडे, उमेश पांडे, ताशा वादक आयुब मुलाणी, पिराजी पांडे, भाविकांच्यासह पोलीस बंदोबस्तात श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी वैकुंठगमन येथे प्रदक्षिणा करून श्री संत तुकाराम महाराज मंदिरासमोर, नांदुरकीच्या वृक्षाजवळ आगमन झाले. वैकुंठगमन स्थान परिसरात प्रवेशद्वारापासून नांदुरकीच्या वृक्षापर्यंत आकर्षक रंगीबेरंगी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.
दरम्यान सकाळी 10 च्या सुमारास हभप बापूसाहेब महाराज मोरे (देहूकर) यांचे वैकुंठस्थान मंदिराजवळ नांदूरकीच्या झाडाखाली महाराजांच्या निर्वाण प्रसंगावर वैकुंठ सोहळा कीर्तन सुरु होते.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, उपायुक्त रामनाथ पोकळे, आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास सोंडे, खासदार श्रीरंग बारणे, उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार गीता गायकवाड, मावळचे तहसीलदार तथा देहू नगरपंचायतीचे प्रशासक मधुसुदन बर्गे, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, मंडल अधिकारी शेखर शिंदे, तलाठी अतुल गीते, सचिन मोरे, जिल्हा परिषद सदस्य शैला खंडागळे, शिवसेनेचे सुनील हगवणे, संस्थानचे माजी विश्वस्त रामभाऊ मोरे, प्रल्हाद मोरे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास गोलांडे आदींच्या उपस्थीत कीर्तनानंतर आरती करण्यात आली.
आरती होताच हरिनाम व तुकाराम महाराजांचे नामस्मरण करीत “बोला पुंडलिका वरदे….हरि विठ्ठल…’ या गजरात भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षावर तुळशीपाने, पुष्पाची उधळण केली. यावेळी उपस्थितांनी महाराजांचे सदेह वैकुंठगमन प्रसंगाचे चित्र स्मरण केले.
“आम्ही जातो आमुच्या गावा…, आमुचा रामराम घ्यावा…’
या अभंगाचे गायन आणि हरिनामाचा गजर करीत सोहळ्यानिमित्त अभिवादन केले. 373 वा तुकाराम बीज सोहळा संपन्न झाल्यावर पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. दुपारी एकच्या सुमारास पालखीचे मुख्य मंदिराकडे पुनरागमन झाले. देहूत येणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करत वाहनांना प्रवेश बंदी केल्याने प्रथमच परिसरात शांतता व शुकशुकाट होते.
बीजोत्सवाची ठळक वैशिष्ट्ये
– मर्यादित भाविकांमध्ये बीज सोहळा साजरा
– मुख्य मंदिरात फुलांची आकर्षक सजावट.
– वैकुंठ गमन स्थान लटकाने आकर्षक फुलांची पायघड्या
– खेळणी, पानफुले, अल्पोपहाराच्या साहित्याची दुकाने थाटण्यास मज्जाव केल्याने यात्रेचे स्वरूप नव्हते
– पोलीस पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त