नवी दिल्ली, दि. 22 – मेक इन इंडियाला आणखी चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने, 1,056 कोटी रुपये खर्चाची 1,300 लाइट स्पेशालिस्ट व्हेइकल भारतीय लष्कराला पुरवण्यासाठी महिंद्रा डिफेंन्स सिस्टिम्स लिमिटेडसोबत (एमडीएसएल) सोबत आज करार केला. या वाहनांचा लष्करात समावेश चार वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
लाइट स्पेशलिस्ट व्हेइकल हे एक आधुनिक लढाऊ वाहन आहे आणि मध्यम मशीन गन्स, स्वयंचलित ग्रेनेड लॉन्चर्स तसेच रणगाडा प्रतिरोधक निर्देशित क्षेपणास्त्रांच्या वहनासाठी विविध लढाऊ एककांसह सज्ज केले जाईल.
लाइट स्पेशलिस्ट वाहनाचे आरेखन स्वदेशी असून ते “एमडीएसएल’ने विकसित केले आहे. ही लढाऊ वाहने छोट्या शस्त्रास्त्रांच्या आगीपासून संरक्षण करण्यासोबतच अत्यंत वेगाने आणि सहज हालचाल करू शकणारी आहेत. तसेच शस्त्रास्त्रे घेऊन चालवणे आवश्यक असलेल्या क्षेत्रात ती छोट्या स्वतंत्र तुकड्यांना मदत करतील.
संरक्षण उद्योगातील स्वदेशी उत्पादन क्षमता दर्शविणारा हा प्रमुख प्रकल्प असून सरकारच्या “आत्मनिर्भर भारत अभियान’ आणि “मेक इन इंडिया’ उपक्रमात आणखी एक मैलाचा दगड ठरेल.