नवी दिल्ली, दि. 22 – अमृतसरमध्ये सापडलेल्या हातबॉम्ब प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने खलिस्तानवादी 7 जणांविरोधात आज आरोपपत्र दाखल केले आहे. जजबीरसिंग सम्रा, वरंदरसिंग चहल, कुलबीरसिंग, मनजित कौर, तरनबीर सिंग, कुलविंदरजितसिंग हे सहाजण बब्बर खालसा इंटरनॅशनल या संघटनेचे हस्तक आहेत.
तर हरमीत सिंग हा पाकिस्तानस्थित खलिस्तान लिबरेशन फ्रंट फोर्स या संघटनेचा स्वयंघोषित प्रमुख आहे. “एनआयए’ने मोहाली येथील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रमध्ये या सात जणांची नावे आहेत. त्यांच्यावर स्फोटक घटकांशी संबंधित कायदा आणि बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यांच्या कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पंजाबमध्ये अमृतसरच्या ग्रामीण भागात पोलिसांच्या नाकाबंदीला चुकवताना मोटरसायकलवरील दोन तरुणांनी फेकून दिलेल्या एका पिशवीमध्ये दोन हातबॉम्ब आणि मोबाईल फोन आढळून आला होता. त्याप्रकरणी जून 2019 मध्ये प्रकरण दाखल केले गेले होते. या प्रकरणाचा तपास पुढे “एनआयए’च्यावतीने केला गेला.
या प्रकरणातील् जजबीर आणि वरिंदर हे पाकिस्तानातून अमली पदार्थांची तस्करी करण्यात गुंतलेले आहेत. तसेच काही दहशतवादी संघटनांशी अणि हरमीत सिंग या दहशतवाद्याशी त्यांचे लागेबांधे आहेत. पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी स्थानिक हस्तकांना हातबॉम्ब उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले असल्याचे “एनआयए’ने म्हटले आहे.