नवी दिल्ली, -लोकसभेच्या 2 आणि 11 राज्यांतील विधानसभांच्या 14 जागांसाठी 17 एप्रिलला पोटनिवडणुका होणार आहेत. त्यांचा निकाल 2 मे यादिवशी जाहीर होईल. पोटनिवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या जागांमध्ये महाराष्ट्रातील पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.
लोकसभा आणि विधानसभांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाने मंगळवारी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्या पोटनिवडणुका देशाच्या 12 राज्यांमध्ये होतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे महाराष्ट्र विधानसभेची पंढरपूर-मंगळवेढा ही जागा रिक्त झाली आहे.
राजस्थान विधानसभेच्या 3, तर कर्नाटक विधानसभेच्या 2 जागा रिक्त आहेत. त्याशिवाय, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, मिझोराम, नागालॅंड, ओडिशा, तेलंगण आणि उत्तराखंडमध्ये विधानसभांच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणुका होतील. माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी आणि वायएसआर कॉंग्रेसचे खासदार बल्ली दुर्गाप्रसाद राव यांच्या निधनामुळे लोकसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. ते अनुक्रमे बेळगांव (कर्नाटक) आणि तिरूपती (आंध्रप्रदेश) मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करत होते. त्या मतदारसंघांमध्येही पोटनिवडणुका होतील. पोटनिवडणुकांसाठीची मतमोजणी पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या निकालादिवशीच होईल.