साव पावलो (ब्राझिल) – करोनाची साथ सुरू झाल्यापासून ब्राझिलचे आरोग्य मंत्री चौथ्यांदा बदलले गेले आहेत. ब्राझिलचे अध्यक्ष जेर बोल्सेनारो यांनी देशातील कार्डिओलॉजी सोसायटीचे प्रमुख मार्सेलो क्विरोगा यांची आरोग्यमंत्री म्हणून नेमणूक केली आहे. ते एदुर्दो पाझुएलो यांच्या जागेवर आरोग्य मंत्री म्हणून काम पाहणार आहेत. पाझुएलो हे माजी लष्करी अधिकारी आहेत. त्यांना गेल्या वर्षी मे महिन्यात आरोग्य मंत्री म्हणून नियुक्त केले गेले होते. पण त्यांना आरोग्य क्षेत्रातील व्यवस्थापनाचा कोणताही अनुभव नव्हता.
अध्यक्ष बोल्सेनारो यांच्याकडून आरोग्य मंत्री बदलाची हालचाल सुरू आहे, असे सुतोवाच पाझुएलो यांनी गेल्याच आठवड्यात केले होते. ब्राझिलमध्ये करोनाची साथ पसरत असतानाच क्विरोगा यांच्या आगोदर तीन आरोग्य मंत्री बदलले गेले होते. करोनाला रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजनांची अंमलबजावणी करण्याचे आव्हान नव्या आरोग्य मंत्र्यांपुढे असणार आहे. बोल्सेनारो यांच्याबरोबर झालेल्या मतभेदांमुळे पाझुएलो यांच्या आगोदरच्या दोन आरोग्यमंत्र्यांनी हे पद सोडले होते,
ब्राझिलमध्ये करोना विषाणूमुळे जवळजवळ 2 लाख 80 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ब्राझिलमध्ये दररोज सरासरी 1,800 मृत्यू होत आहेत. तर मोठ्या शहरांमधील आरोग्य सेवा यंत्रणा कोसळण्याच्या मार्गावर आहेत.