पुणे,दि.16 –नानापेठेतील सराईत गुंड सुरज ठोंबरे याच्या टोळीतील मोक्का गुन्हयात फरार आरोपीस समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. तो दरोडा आणी दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्हयातही वॉंण्टेड होता. गुन्हे शाखा त्याचा कसोशीने शोध घेत असतानाच समर्थ पोलिसांच्या तावडीत तो सापडला. तो बायकोला भेटायला लपत छपत आला असतानाच समर्थ पोलिस पथकाने त्याला घेरुन ताब्यात घेतले.
गोट्या माने उर्फ नरसिंह भिमा असे अटक आरोपीचे नाव आहे. तो सांगवी पोलीस ठाण्यात दरोडा, फरासखाना पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी आणी समर्थ पोलीस पोलीस ठाण्यात मोक्काच्या गुन्हयात वॉंटेड होता. आंदेकर टोळीतील प्रतिस्पर्धी असलेल्या सुरज ठोंबरे टोळीचा तो सदस्य आहे.पोलिसांनी सुरज ठोंबरे टोळीस मोक्का लावला आहे.
मोक्का लागल्यापासून गोट्या फरार होता. ठोंबरे टोळीस मोक्का लागल्यापासून सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर हे वेगवेगळी पथके तयार करुन आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान गोट्या त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी मंगळवार पेठेतील कलमाडी शाळेजवळ येणार होता. याची खबर पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, पोलीस शिपाई निलेश साबळे, सुमित खुटटे व महेश जाधव यांना मिळाली. त्यानूसार सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याला अटक करुन मोक्का न्यायालयात हजर केले असता 22 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अतिरीक्त पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, उपायुक्त प्रियंका नारनवरेल वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुशिल लोणकर, संतोष काळे, अंमलदार सुभाष पिंगळे, विठ्ठल चोरमले, सुुभाष मोरे, हेमंत पेरणे, सचिन पवार, श्याम सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.