राजगुरूनगर (पुणे) – राजगुरूनगर नगरपरिषदेतच्या प्रभाग क्र. तीनमध्ये सुमारे 337 बोगस मतदारांची नावे समाविष्ट झाली आहेत. नगरपरिषद प्रशासन फेर सर्वेक्षण करून मतदार यादीतून ही नावे वगळावीत, अशी मागणी विकास चव्हाण यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांच्याकडे केली आहे.
राजगुरूनगर नगरपरिषदेची मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात अनेक व्यक्तींनी हरकती घेतल्या आहेत. स्थानिक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली आहेत तर इतर गावाच्या मतदारांची नावे मतदान यादीत आली आहेत, त्यामुळे गोंधळाची मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे, असा आरोप अनेक इच्छुक उमेदवारांनी केला आहे. नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 8 नंतर आता प्रभाग क्र. 3 मध्ये बोगस मतदार समाविष्ट असल्याचे उघड झाले आहे.
प्रभाग क्र. 3 मध्ये ग्रामपंचायत राक्षेवाडीमधील 98 मतदार, गुळाणी, ढोरेवाडी, वरची भांबुरवाडी, झित्राई मळा, टाकळकरवाडी, शोरीला, दौंडकरवाडी, खरपुडी खुर्द, कोरेगाव बुद्रुक, वाकी खुर्द, मोशी आणि भोसरी या गावातील 66 मतदार तगर ज्यांचा ठावठिकाण नाही ते 173 असे एकूण 337 मतदारांची नावे राजगुरुनगर नगरपरिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणूक मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. राजगुरूनगर नगरपरिषेदेच्या प्रभाग 3 मध्ये मागील निवडणुकीत 1230 मतदार होते; मात्र यावेळी 1654 इतके प्रारूप यादीत मतदार संख्या आहे. जाणीवपूर्वक आणि राजकीय हेतू ठेवून बाहेरगावच्या मतदारांचा मतदार यादीत समावेश केल्याने स्थानिक मतदारांच्या हक्कावर गदा येत आहे.
सर्व प्रभागांमध्ये फेरसर्वेक्षण घ्या -आमदार मोहिते
राजगुरूनगर नगरपरिषदेत अनेक नावे समाविष्ट झाल्याने नगरपरिषदेने सर्व प्रभागांमध्ये फेरसर्वेक्षण करून मतदार यादी तयार करावी अशा सूचना आमदार दिलीप मोहिते यांनी तहसीलदारांना केल्या आहेत. माजी नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे म्हणाले की, सर्वच प्रभागांमध्ये मतदार यादीत नावे समाविष्ट केली अनेक मतदारांची वगळली असे प्रकार झाले आहे. अनेक जाणांनी हरकती घेतल्या आहेत. सर्वच प्रभागाचे पारदर्शक फेरसर्वेक्षण करावे, असे त्यांनी नमूद केले.